
मोठी बातमी! जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! ई-मेलमुळे खळबळ; न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांची धावपळ
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. न्यायालय प्रशासनाने त्याची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना दिल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे विश्वजीत घोडके, सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन मेत्रे, सायबर विभागाचे निरीक्षक जय गायकवाड यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा बॉम्बशोधक पथकासह न्यायालयात दाखल झाला.
त्यावेळी न्यायालयाच्या विविध दालनांमध्ये नियमित कामकाज सुरू होते. काही ठिकाणी महत्त्वपूर्ण सुनावण्या, तर काही न्यायालयांमध्ये चॅप्टर केसेस सुरू होत्या. मात्र, अचानक इमारत रिकामी करण्याचे निर्देश मिळताच न्यायालयीन कामकाज थांबवण्यात आले. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी झाली. या गोंधळाचा परिणाम सातारा-कोरेगाव मार्गावरील वाहतुकीवरही झाला. दरम्यान, बॉम्बशोधक पथकाने न्यायालयाच्या प्रत्येक मजल्याची, दालनांची आणि परिसराची बॉम्ब डिटेक्टरच्या साहाय्याने सुमारे दीड तास कसून तपासणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
मुख्य न्यायाधीशांनाच थेट धमकीचा ई-मेल आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला आहे. ई-मेल नेमका कोठून पाठवण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि धमकी देण्याचा उद्देश काय, याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. ई-मेलचा आयपी अॅड्रेस शोधण्यावर तपास यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. या घटनेमुळे न्यायालयीन वर्तुळासह सातारा शहरातही काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
Ans: सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता.
Ans: दुपारी ३.१५ वाजता स्फोट घडवण्याचा इशारा ई-मेलद्वारे देण्यात आला होता.
Ans: खबरदारी म्हणून न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना न्यायालयातून बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने सुमारे दीड तास न्यायालय परिसराची तपासणी केली.