
Satara Ganesh Visarjan 2026
सातारा शहर हद्दीतील ३५, तर शाहूपुरी हद्दीतील २३ मंडळांच्या मिरवणुका अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मार्गस्थ झाल्या. गुरुवार पेठेतील मानाच्या शंकर-पार्वती गणपती मंडळाच्या पूजनानंतर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेला उत्साह पहाटेपर्यंत कायम राहिला. शेवटच्या गणरायाचे सकाळी सव्वासातच्या सुमारास विसर्जन झाल्याची माहिती देण्यात आली.
राजवाडा, मोती तळे, प्रतापगंज पेठ, मोती चौक या मार्गावरून मिरवणुका पुढे सरकत होत्या. सायंकाळनंतर मोती चौकातून गोलबागेला वळसा घालत मोठा चौक, प्रतापगंज पेठमार्गे बुधवार नाका येथील विसर्जन तळ्याकडे गणेश मंडळे रवाना झाली. मिरवणुकीच्या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.
यंदा ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत असतानाच बहुतांश मंडळांनी डॉल्बीऐवजी ढोल-ताशा, लेझीम आणि अन्य पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे मिरवणुकांमध्ये वाद्यांचा ठेका, जयघोष आणि भक्तिमय वातावरण अधिक जाणवत होते. ध्वनीवर्धक यंत्रणांवर लक्ष ठेवण्यासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत होती. ज्येष्ठ नागरिकांच्या १४ हून अधिक संघटनांनीही ध्वनीप्रदूषणाविरोधात मूक मोर्चा काढला होता.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात बंदोबस्त वाढविला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार सुमारे दोन हजार अधिकारी-कर्मचारी तैनात होते. त्यापैकी साडेसातशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी शहरातील मिरवणूक मार्गावर कार्यरत होते.
बुधवार नाका येथील विसर्जन तळ्यावर पालिकेने १८ कर्मचारी, सहा जीवरक्षक आणि ५० फुटी हायड्रोलिक क्रेनची व्यवस्था केली होती. शहरात पाच ठिकाणी विसर्जन कुंड उभारण्यात आले होते. काही उपनगरांतील मंडळांनी शहरातील गर्दी टाळून माहुली येथे कृष्णा नदीत विसर्जन केले.
ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर प्रकर्षाने जाणवला. ढोल-ताशा, लेझीम आणि मर्दानी खेळांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकांना पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले. डॉल्बीला मोठ्या प्रमाणावर अंतर दिल्याने ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा काही प्रमाणात बाजूला राहिल्याचे चित्र होते.
सातारा शहरातील सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ५८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे विसर्जन झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. शहरातील विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव, विसर्जन कुंड, जीवरक्षक आणि यांत्रिक यंत्रणेची व्यवस्था केली होती.