शक्तीपीठ महामार्गावरुन सतेज पाटील यांचा प्रश्न, दादा भुसेंचे प्रत्युत्तर
मुंबई : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरुन राज्य सरकारला घेरले आहे. नागपूर ते गोवा असा हा महामार्ग असणारा आहे. यामध्ये अनेक शक्तीपीठ व देवस्थानांपर्यंत प्रवास सोपा होणार आहे. मात्र कोल्हापूरमधून या प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी देखील विरोध केला होता. शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आता विधीमंडळामध्ये देखील उपस्थित करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गचा प्रश्न उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे. मात्र त्यांनी उत्तर देताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे राजकारणामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
विधीमंडळामध्ये काय म्हणाले सतेज पाटील?
विधान परिषदेमध्ये कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा समोर आणला आहे. ते म्हणाले, “राज्यात नव्याने शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार असून पत्रादेवी बांदा (सिंधुदूर्ग) ते दीग्रज (वर्धा) अशा 805 किमी मार्गासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परंतु, या महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबत निवेदनही आले नव्हते. तरीही हा महामार्ग का होत आहे. याबाबत राज्य शासनाने तातडीने कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत?” असा प्रश्न आमदार सतेज पाटलांनी उपस्थित केला.
दादा भुसेंचे सभागृहामध्ये प्रत्युत्तर
यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. सभागृहामध्ये उत्तर देताना दादा भुसे म्हणाले, “या महामार्गाबाबत काही निवेदने आली होती. त्यानुसार, काही निवेदनात मागणी आहे की रस्ता झाला पाहिजे. तर काही जणांनी या प्रकल्पात बदल सुचवले आहेत. त्यामुळे, स्थानिक पातळीवर सर्वांशी चर्चा करून पुढे या प्रकल्पाबाबत मार्गक्रमण केलं जाईल.” या स्पष्टीकरणानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनीही कोल्हापूरच्या वतीने त्यांचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “कोल्हापूर हा सुपीक जिल्हा आहे. अनेक प्रकल्पांसाठी कोल्हापूरकरांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. पण सध्या शक्तीपीठाला पर्यायी मार्ग आहे. शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करणार असल्याचं जाहीर करणार का?” असा थेट प्रश्न शिंदे यांनी केला.
या प्रश्नावर उत्तर देताना दादा भूसे म्हणाले, भूसंपादनाचा विषय फार पुढचा आहे. परंतु, आपल्याकडे समृद्धी महामार्ग झाला आहे. या महामार्गाने एक वेगळा नावलौकिक कमावला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून महामार्ग महत्त्वाचे आहेत. या महामार्गांवर काही अपघात होतात. समृद्धी महामार्गावरच अपघात होतात असे नाही. ते तर खेडेगावातील रस्त्यांवरही होतात. अपघात होऊच नये अशी आपली भावना आहे. ज्या महामार्गाच्या भूसंपदानचीही प्रक्रिया सुरू झाली नाही. तिथे कमिशन वगैरे घेतल्याचं बोलताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत दादा भूसे यांनी विरोधकांच्या प्रश्नांचा उत्तर दिले. मात्र याने समाधान न झालेल्या विरोधकांनी शक्तीपीठ प्रकरणावरून राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशा मागणीसह सभागृहात कल्लोळ घातला. हा गोंधळ वाढल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हे सभागृह दोनवेळा स्थगित करावं लागलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग हा महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे.