लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली 'या' दर्जाची सुरक्षा
पुणे : ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे. लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान ते अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे आता हाके यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती मिळाली आहे.
लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
लक्ष्मण हाकेंचे गंभीर आरोप
माझ्यावर हल्ला करणारे जो दळवी आणि त्याचे सहकारी आहेत यांचे फोटो आता समोर आले आहेत आणि यांचे फोटो शरदचंद्र पवार आणि निलेश लंके यांच्यासोबत देखील आहेत. या सर्व लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे, असा आरोप हाके यांनी केला आहे. माझी आणि या माणसांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही , पण पवार कुटुंबाने असे गुंड पोसलेले आहेत आणि आज त्याच गुंडानी माझ्यावर हल्ला केला, असाही आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती मिळाली आहे.
लक्ष्मण हाके आक्रमक
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले होते. सरकारने पाचव्या दिवशी त्यावर एक तोडगा काढला. त्यांच्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्यावर सरकारने सहमती दर्शवली. याविषयीचा एक शासन निर्णय घेण्यात आला. त्यावरून काही ओबीसी नेते अस्वस्थ झाले आहे. सरकारने दबावात निर्णय घेतल्याचा आणि ओबीसीत कुणबी घुसवल्याची चर्चा सुरू आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहे. सरकारने काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी हाके सतत करत आहेत.