परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव; समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
सोलापूर : झेडपीची बिघडलेली शिस्त पूर्वपदावर आणण्यासाठी नव्याने पदभार घेतलेल्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. अशात माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. शिक्षण विभागाचा कारभार सुधारायचा असेल तर लिपिक संजय बाणूर यांची माळशिरसला बदली करा, असा सल्ला झेडपीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी प्रशासनाला दिला आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी अचानकपणे स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज देवून दीर्घ रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. टप्पा अनुदानानील उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे शालार्थ आयडीचे प्रस्ताव देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असताना शिक्षणाधिकारी फडके यांनी घेतलेला हा निर्णय अडचणीचा ठरला आहे. तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची पुण्याला बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. प्रभारी म्हणून दोन अधिकार्यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान फडके हे या पदावर लातूरहून हजर झाले. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा असताना पुन्हा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चुकीच्या शालार्थ आयडीमुळे पगार निघत नसल्याने वैतागून खाजगी शाळेतील शिपाई काळे यांनी आत्महत्या केली. त्यानंतर शालार्थ आयडीचे प्रकरण गंभीर झाले. अशात प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठविण्याचे आदेश सीईओ आव्हाळे यांनी दिले. यात माध्यमिक शिक्षण विभागात बडे प्रस्थ निर्माण करणार्या लिपिक संजय बाणूर यांचा समावेश आहे. त्यांच्या बदलीसाठी यापूर्वी एका संघटनेने तीन महिने आंदोलन केले होते. त्यानंतर तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांनी बाणूर यांची समाजकल्याण विभागाला प्रतिनियुक्ती दिली. पण एकही दिवस बाणूर समाजकल्याणला गेले नाहीत. जाता जाता स्वामी यांनी बाणूर यांना या जबाबदारीतून मुक्त केले.
याच काळात माध्यमिक शिक्षण विभागात शालार्थ आयडी प्रकरणावरून गोंधळ झाला. त्यामुळे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांचा पदभार काढण्यात आला. त्यांना कार्यालय मिळू देण्यात आले नाही. यासाठी मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याची चर्चा होती. सीईओ आव्हाळे हजर झाल्यावर वठारे यांना कार्यालय मिळाले.
साठे काय म्हणाले?
माध्यमिक शिक्षण विभागातील या गोंधळाची माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यानी दखल घेतली. वडाळ्यामुळे ओडीएफ प्लसचे काम चांगले झाले आहे, पण गावागावात प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी निधी मिळत नसल्याबाबत त्यांनी शुक्रवारी प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी स्मिता पाटील यांची भेट घेतली. त्यावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी स्वच्छता विभागाचे व्यवस्थापक सचिन जाधव यांना पाचारण करून कारणे जाणून घेतली व नव्याने प्रस्ताव करण्याच्या सूचना केल्या. त्यावर साठे यांनी नव्या अधिकार्यांमुळे कारभार सुधारत आहे. माध्यमिकचे तेवढं बघा. शिक्षकांची फार पिळवणूक करतात हे लोक. पदावर असताना माजी शिक्षणाधिकारी पाटील यांची मी सभेत पोलखोल केली होती. या विभागात ठाण मांडून बसलेल्या बाणूर यांना माळशिरस किंवा लांब बाहेर पाठवा. बघा कशी या विभागात सुधारणा होतेयं ती. काही ठराविक मंडळीमुळे कारभार बदनाम होत आहे. यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी केली.