महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होतं. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मधुकरराव पिचड यांना दोन महिन्यापूर्वी 15 ऑक्टोबरला राहत्या घरात ब्रेन स्ट्रोक आला होता. तेव्हापासून त्यांचे नाशिक येथील नाइन पल्स या खाजगी रुग्णालयाात उपचार सुरु होते. त्यांनी मधल्या काळात उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र आज त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले.
मधुकरराव पिचड यांचा राजकीय प्रवास
मधुकरराव पिचड हे नगरमधील अकोले मतदारसंघातून 1980 साली पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2014 पर्यंत तब्बल 35 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1991 साली ते आदिवासी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडे इतर खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. 1995 ते 1999 याकाळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
राष्ट्रवादीच्या उभारणीत मोठे योगदान
शरद पवार यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली त्यावेळी मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या बांधणीकरिता महत्वाची भूमिका बजावली. केवळ आदिवासी समाजाचे नेते म्हणूनच नाही तर पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी पक्षामध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. 1999 ते 2003 या दरम्यान ते आदिवासी विकास मंत्री होते तसेच 2013 ते 2014 या कालावधीतही त्यांनी या खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले.
भाजप पक्षप्रवेश
2019 मध्ये त्यांनी आणि त्यांचे पूत्र वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात होता. त्यांच्या भाजप प्रवेशाने नगरमधील भाजपची ताकद वाढली होती. तसेच एक पक्षामध्ये आदिवासी नव्हे तर अनुभवी नेतृत्वही मिळाले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी ज्यष्ठे नेते शरद पवारांची भेट घेतल्याने ते पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये येतील अशा चर्चा सुरु होत्या. 2021 पासून त्यांचे पूत्र वैभव पिचड हे सध्या भाजपमध्ये आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत.