फोटो- सोशल मिडिया
मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.5) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या पाच वर्षांपासून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीसांचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण अखेर सत्यात उतरला. हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पण, यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची नाराजी पाहिला मिळाली.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: वडिलांना तुरूंगात टाकताच सोडली शाळा? काय आहे देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ किस्सा
मुख्यमंत्र्यांसह 20 ते 22 मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी करण्याची योजना होती. पण महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरून एकमत होऊ शकले नाही. परिणामी, पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी पार पडला. मात्र, आता इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? याबाबतचे सुतोवाच शिवसेना (शिंदे) गटाच्या नेत्यांनी केले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी ठरविण्यात आला आहे. मंत्रिपदासाठी कोणाला संधी द्यायची, खातेवाटप आणि मंत्रिपदांच्या वाटपाचा पेच यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपूर्ण मंत्रिमंडळाचा जंगी शपथविधी करण्याचे नियोजन तूर्तास फिसकटले आहे.
पंतप्रधान मोदींना वेळ नसल्यामुळे शपथविधी पुढे
शपथविधीच्या काही वेळापूर्वी शिवसेना (शिंदे) गटाचे नेते भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद झाला होता. तेव्हा त्यांनी इतर मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल अद्याप आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाही. पण इतर मंत्र्यांना 11 डिसेंबर रोजी शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला वेळ थोडा कमी असल्याचे म्हटले जात आहे. तेवढ्या वेळेत इतरांचे शपथविधी उरकणार नाहीत. त्यामुळे आज फक्त तिघांना शपथ दिली जाईल. उर्वरित मंत्र्यांना नंतर शपथ दिली जाईल.
महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू
एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी भाजपाने फेटाळली आहे. त्याबदल्यात भाजपने नगरविकास खाते देण्याची तयारी दर्शविली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आठ दिवसांत इतर मंत्र्यांनाही शपथ
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचेच दुसरे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार १२ किंवा १३ डिसेंबर रोजी होईल, असे सांगितले आहे.
मंत्रिपदासाठी तीनही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा
भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीनही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे आणि कोणाला वगळायचे, असा पेच फडणवीस आणि शिंदे यांच्यापुढे आहे. नव्या सरकारमध्ये स्वच्छ चेहऱ्यांना प्राधान्य तसेच नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे.
हेदेखील वाचा : Winter Session 2024: शपथविधीनंतर ‘या’ दिवसपासून सुरू होणार महायुतीचे हिवाळी अधिवेशन