
स्वबळावर की एकत्र लढायचं? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भूमिका जाहीर
आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी
स्वबळावर की एकत्र लढायचं?
बड्या नेत्याची भूमिका जाहीर
नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले. जुन्नर तालुक्यात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. हा मेळावा माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत झाला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि माजी आमदार अतुल बेनके उपस्थित होते.
गारटकर म्हणाले,“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्म कदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी आहे. पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा सतत ओघ सुरू आहे. जनतेत राष्ट्रवादी काँग्रेसविषयी विश्वास आणि बांधिलकी वाढत आहे.”त्यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला असला तरी, कार्यकर्त्यांमध्ये एकी आणि विकासाच्या विचारांबद्दल निष्ठा कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“अद्याप उमेदवारी जाहीर नाही”
माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, “जुन्नर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप कोणत्याही उमेदवारांची घोषणा केलेली नाही. लवकरच पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल.”ते पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील, मात्र काही ठिकाणी मित्र पक्षांसोबत कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ॲडजस्टमेंट करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या मेळाव्याला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये बाजार समिती सभापती संजय काळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, भाऊ देवाडे, दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, महिला जिल्हा निरीक्षक उज्वला शेवाळे, विनायक तांबे, राष्ट्रवादी महिला तालुकाप्रमुख सुप्रिया लेंडे, वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे, पुष्पा गोसावी, पापा खोत, फिरोज पठाण, मारुती वायाळ, अतुल भांबेरे, निवृत्ती काळे, वैभव काळे, अजिंक्य घोलप, भाऊ कुंभार, ज्योती संते आदी मान्यवर उपस्थित होते.