शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार (Photo - Social Media)
सांगली : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असून, उद्या (ता. २१) सांगलीत भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक नेते मोर्चात सहभागी होणार आहेत.
उद्या सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात सुपीक व बागायती जमीन बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी आता एकजुटीने विरोध करण्याची गरज आहे. हा लढा केवळ एखाद्या गावाचा किंवा संघटनेचा नसून शेतकऱ्यांच्या जमिनी, भवितव्य आणि पुढील पिढ्यांच्या हक्काचा आहे. त्यामुळे प्रत्येक बाधित शेतकऱ्याने मोर्चात उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी, असे आवाहन नेत्यांकडून करण्यात आले आहे.
कृष्णा-वारणा खोऱ्यातील कसदार व बागायती जमीन महामार्गासाठी संपादित करण्यास आंदोलकांचा तीव्र विरोध आहे. विद्यमान रस्ते आणि महामार्गांचे रुंदीकरण अथवा सुधारणा करण्याऐवजी हजारो कोटी रुपये खर्चून नवीन महामार्ग उभारण्याची आवश्यकता काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मोर्चाला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत. तसेच सांगलीचे खासदार विशाल पाटील उपस्थित राहणार आहेत. राजू शेट्टी, जयंत पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याने मोर्चाला मोठे राजकीय बळ मिळणार आहे.
‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करायचा असेल तर शेतकऱ्यांची एकजूट रस्त्यावर दिसली पाहिजे. त्यामुळे गावागावांतून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सांगलीत यावे आणि मोर्चा यशस्वी करावा,’ असे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील बाधित गावांमध्ये मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून, शेतकरी, महिला, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे उद्याचा मोर्चा शक्तीपीठ महामार्गविरोधातील सांगली जिल्ह्यातील मोठे शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे.
भाजपा सरकारने राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती…; काँग्रेसचा इशारा
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडूनही आवश्यक तयारी करण्यात येत आहे. मोर्चाच्या मार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची शक्यता असून, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, जमीन मोजणी थांबवावी, शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणतीही पुढील कार्यवाही करू नये आणि पर्यायी मार्गांचा विचार करावा, या मागण्या मोर्चातून मांडण्यात येणार आहेत. उद्याच्या मोर्चात किती मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतात आणि सरकार त्याची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






