सौजन्य - सोशल मिडीया
वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध तिकोना किल्ला अर्थात वितंडगड येथे येणाऱ्या पर्यटकांना गडाचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू तसेच परिसराची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिकोना गडाचा इतिहास ऑडिओच्या माध्यमातून ऐकता येणार असून, त्यामुळे गडभ्रमंतीचा अनुभव अधिक माहितीपूर्ण होणार आहे. तिकोना गडाच्या विविध ठिकाणांची तसेच गडाच्या इतिहासाची माहिती पर्यटकांना देण्यासाठी यापूर्वी उपलब्ध असलेल्या पारंपरिक माहितीबरोबरच आता ऑनलाइन ऑडिओ बुकची निर्मिती करण्यात आली आहे. गडावर लावण्यात आलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर पर्यटकांना संबंधित ऐतिहासिक माहिती ऐकता येणार आहे.
तिकोना किल्ल्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक व शिवप्रेमी भेट देतात. अनेक पर्यटकांना गडाच्या वास्तूंचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि गडाशी संबंधित विविध घटनांची माहिती प्रत्यक्ष पाहताना मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन क्यूआर कोडच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
२४ तास उपलब्ध राहणार माहिती
या उपक्रमामुळे पर्यटकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार तिकोना गडाचा इतिहास ऐकता येणार आहे. २४ तास ही माहिती उपलब्ध राहणार असल्याने गडावर येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही वेळी क्यूआर कोड स्कॅन करून ऐतिहासिक माहिती मिळवता येईल. विशेष म्हणजे, गडावरील विविध ठिकाणी संबंधित माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक डिजिटल माध्यमाचा उपयोग करण्यात आला आहे.
एआय तंत्रज्ञानाची जोड
या ऑनलाइन ऑडिओ बुकच्या निर्मितीसाठी एआय फाउंडेशन आणि नेटक्रिएटर टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तिकोना गडाचा इतिहास आणि उपलब्ध माहिती अधिक प्रभावी पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यात तिकोना गडाचा इतिहास तसेच विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्यामुळे गडभ्रमंतीसोबतच पर्यटकांना इतिहास समजून घेण्याची आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव निर्माण होण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून तिकोना गडाच्या इतिहासाचे जतन आणि प्रसार करण्याबरोबरच तरुण पिढीला गड-किल्ल्यांच्या इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. डिजिटल माध्यमातून माहिती उपलब्ध होत असल्याने राज्यातील तसेच परराज्यातील पर्यटकांनाही याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमावेळी तनीर इनामदार, प्रिया जोशी, सुहास गाडेकर, विनोद गोरे, अभिजित पाटील, नितीन भगवत, पियुष कुंभार, संतोष सावळे, किरण चिमटे आदी उपस्थित होते.






