Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या नवीन शासकीय निवासस्थान 'मेघदूत' या बंगल्याचा गृहप्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले.
शंभुराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर
Shambhuraj Desai News: महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्र्यांमना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले. या शासकीय बंगल्यांच्या वाटपात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना ‘मेघदुत बंगला’ मिळाला. त्यानंतर आज (३ ऑगस्ट) शंभुराज देसाई यांनी त्यांच्या कुटुंबियांसह बंगल्यात प्रवेश केला. गृहप्रवेशावेळी मात्र शंभुराज देसाई यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. या बंगल्याचे आणि देसाई कुटुंबियांचे अनेक वर्षांपूर्वीचे नातेही आता समोर आले आहे.
मेघदुत बंगल्याशी शंभुराज देसाई यांची नाळ जोडली गेली आहे. ५५ वर्षांपूर्वी याच मेघदुत बंगल्यात शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता. त्यामुळे मेघदुत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाई, त्यांच्या मातोश्री आणि संपूर्ण देसाई कुटुंबीय भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनादेखील मेघदूत बंगला मिळाला होता. आजोबांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच शंभूराज देसाई यांचा जन्म झाला. बालपणीचे पहिले पाच वर्षे त्यांनी याच बंगल्यात घालवले होते.
त्यानंतर तब्बल पाच दशकांनंतर शंभुराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींनी या बंगल्यात गृहप्रवेश केला. गृहप्रवेशावेळी त्या वास्तुप्रती असलेल्या भावना अनावर झाल्यानेच शंभुराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात पाणी आले. गृहप्रवेशावेळी देसाई कुटुंबीय, नातेवाईक आणि काही निकटवर्तीयदेखील उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेशाचा विधी पार पडला. पण वातावरण पूर्णपणे भावनिक झाले होते. मेघदुत बंगल्याशी संबंधित असलेल्या आठवणी, जुने क्षण आणि बालपणीचे अनुभव यांमुळे घरातील प्रत्येकजणाच्या चेहऱ्यावर भावना दाटून आल्या होत्या
काय म्हणाले शंभुराज देसाई?
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या नवीन शासकीय निवासस्थान ‘मेघदूत’ या बंगल्याचा गृहप्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले. “आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने या बंगल्यात गृहप्रवेश केला. या बंगल्याशी लहानपणापासून अनेक आठवणी जोडल्या आहेत. लग्नानंतर आई याच घरात आल्या होत्या. आज पुन्हा एकदा त्या येथे आल्या आणि त्यावेळी त्या भावूक झाल्या. आम्ही सर्वजणही भावूक झालो,” असे ते म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी ‘मेघदूत’ बंगला मला दिला याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. मी एकदाच विनंती केली होती, दुसऱ्यांदा सांगावं लागलं नाही,” असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना देसाई म्हणाले, “लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात मोठं कार्य केलं. तसंच कार्य माझ्या हातून घडावं, हीच माझी भावना आहे. आई-वडिलांची इच्छा होती की मी स्पर्धा परीक्षा द्यावी. आई म्हणायची, ‘तू कलेक्टर हो.’ पुण्यात शिक्षण घेत असताना देशपांडे सरांकडे जायचं, असं मला सांगितलं जायचं.” “वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. मतदारसंघातील ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या आईला विनंती करून मला राजकारणात पाठवण्यास सांगितलं, आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला,” असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Shambhuraj desai news what is shambhuraj desais special connection with the meghdoot bungalow