मुंबई : सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली असून आत्तापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक राज्यामध्ये जोरदार रंगली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाल्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला. शरद पवार गटासमोर नवीन निवडणूक चिन्ह असलेलं तुतारी चिन्ह जनमाणसांमध्ये पोहचवण्याचं मोठ आव्हान होतं. पण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे शिवधनुष्य अगदी समर्थपणे पेललेल दिसून आले आहे. जयंत पाटील यांनी राजकारणामध्ये शतकी खेळी पार केली आहे.
शरद पवार गटासाठी प्रतिष्ठेची लढाई
लोकसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला. अनेक ठिकाणी शरद पवार गटासाठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. निकाल मतदारांच्या हाती असला तरी स्वतः शरद पवार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील य़ांचा देखील मोठा वाटा आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जयंत पाटील यांनी राज्यभर दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीचा प्रचार आणि सभा गाजल्या. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यामध्ये तब्बल 103 सभा घेतल्या आहेत.
शरद पवार गटाकडून ट्वीट
‘१००’ हा केवळ आकडा नाही, ही नांदी आहे नव्या महाराष्ट्राची,
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसुर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या वारशाची…यंदा तुतारी वाजणार आणि बदल घडवणारच!
जय भवानी
जय शिवाजी@Jayant_R_Patil pic.twitter.com/ga8jbzQgVQ— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 18, 2024
प्रचार सभेमध्ये शंभरी पार
काही दिवसांपूर्वी महायुतीचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील 100 सभा घेतल्याचे जाहीर केले होते. फडणवीसांसोबतच शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी देखील अथक प्रचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप श्रेष्ठींनी राज्यभर केलेल्या अनेक टीकांवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या सभांमधून प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या विकासकामांची यादी सांगत महायुतीवर निशाणा साधला. जयंत पाटील यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये शंभरी पार केली असून त्यांचे महाविकास आघाडीकडून कौतुक केले जात आहे.