शरद पवारांनी पुण्यातून लावला मुख्यमंत्री फडणविसांना थेट फोन; नेमकं कारण काय?
पुणे : पुण्यातील भीमथडी जत्रेला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हजेरी लावली. त्यांनी स्टॉलवर जाऊन पाहणी केली, तसेच विक्रेत्यांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेतली. नंतर शरद पवार यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत भीमथडी जत्रेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
शहरात भीमथडी जत्रेचे १८ वे वर्ष आहे. भीमथडीत विविध १३ राज्यांमधील ३१ स्टॉल असून त्यात महिला बचत गटाच्या व त्या ठिकाणची संस्कृती जपणाऱ्या विविध वस्तू आहेत. ही जत्रा पुणेकरांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू असून, राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार आणि काश्मीर आदी १३ राज्यातील, हस्तकलेच्या माध्यमातून बनविलेल्या विविध उपयोगी वस्तु आहेत.
यंदाच्या भीमथडीत देवराईमध्ये सुमारे १२० प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड केली आहे. देवराईमुळे देशी वृक्षांचे मुबलक बीज तयार होते. देवराई मुळे गावागावात देवराई तयार झाल्यास ऑक्सिजन बँक, निसर्गातील विविध पक्षांना संरक्षण, निसर्गाचा समतोल, किडे मुंग्या यांना आश्रय व खाद्य, शेती उत्पनात वाढ असे विविधांगी फायदे मिळतात. याशिवाय भीमथडीत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांचे स्टॉलमध्ये महाराष्ट्रातील आदिवासींच्या शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, आदिवासींच्या सहकारी संस्था आदींच्या माध्यमातून बनवलेल्या विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत.
संतोष देशमुख प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले, “मी काल भेटून आलो त्या ठिकाणची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या घटनेची सखोल चौकशी करून न्याय देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.” तसेच दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबतही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या कार्यक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी फडणवीस यांना केले.
हे सुद्धा वाचा : महापालिका निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, आता आम्ही…
भीमथडी जत्रेचा ऐतिहासिक वारसा
भीमथडी जत्रेला सुरुवात होऊन १८ वर्षे झाली आहेत. यंदा या जत्रेला अप्पासाहेब पवार यांना समर्पित करण्यात आले आहे. पवार म्हणाले, “भीमथडी जत्रा ही आता देशपातळीवर पोहोचत आहे, याचा मला अभिमान आहे. जत्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहतील.”