mahavikas aaghadi
मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या असून अनेक वाद निर्माण झाले आहे. लाडकी बहीण योजनेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. दरम्यान, आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे प्रचारप्रमुख म्हणून कामगिरी करु शकतात. मात्र यावरुन आता महायुतीने खोचक टोला लगावला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी खरपूस टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेवरुन महाविकास आघाडीने दीड हजारच दिले जाणार असल्यामुळे आरोळी उठवली होती. आता पहिले दोन हफ्ते खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे गटाला धारेवर धरले आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सरकारने ज्या घोषणा केल्या त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. महिला भगिनीच्या अकाउंटमध्ये जेव्हा 3 हजार रुपये जातात तो आनंद सर्वसामान्य कुटुंबांनाच माहित आहे. म्हणून आज त्यांच्याघरात दिवाळी आहे. तुमच्या माझ्या सारख्यांना तीन हजारांचं महत्व कळणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांचे वैशिष्ट्य आहे ते जे बोलतात ते करतात. काही लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांचा पोटसूळ उठलं याच्याने काय होतं, त्याच्याने काय होतं, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
तुम्हाला जेव्हा संधी होती तेव्हा तर
पुढे आमदार शिरसाट म्हणाले, ह्या चर्चा केव्हा सुरू होतात जेव्हा कोणी देत, तुम्ही का दिले नाही हा माझा प्रश्न आहे. तुम्ही अंगणवाडी महिला, बालवाडी सेविकांना दिले नाहीत, हे सर्व या शासनाने दिलं. तुम्हाला जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही लोकांना भेटत नव्हते त्यांचे काम करत नव्हते. तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही फक्त टीका करणे आमच्याकडे काय आह. दानत असावी लागते, अशा शब्दांत शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.
यांचे नैया डुबली म्हणून समजा
त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण अशी चर्चा सुरु असताना यावरुन मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता मात्र ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणूकीचे प्रचार प्रमुख होणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर संजय शिरसाट म्हणाले, अशा चर्चा असतील तर मग तर यांचे नैया डुबली म्हणून समजा. डिव्हिजन वाईज चार सभा होतील आणि प्रचार संपेल. काँग्रेस आणि शरद पवार धुरा वगैरे देणार नाहीत परंतु जबाबदारी घेण्याची सुद्धा यांची मानसिकता नाही. खऱ्या अर्थाने लोकांना प्रश्न पडतोय पक्षप्रमुख कोण उद्धव ठाकरे साहेब आहेत की संजय राऊत आहेत, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.