नाशिक : शिवसेना आमदार अपात्रतेचा (ShivSena MLA disqualification) मुद्दा निकालानंतर देखील शांत झालेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिंदे गटाच्या (Shinde group) बाजूने निकाल दिल्यामुळे ठाकरे गट (Thackeray group) आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने महापत्रकार परिषद (Mahapatrakar Parishad) घेत अनेक पुरावे, कागदपत्रे व व्हिडिओ समोर आणत प्रश्न उपस्थित केले. यावर शिंदे गटातील नेते व मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रत्युत्तर दिले. अध्यक्ष महोदय यांच्या समोर जी कागदपत्रे ठेवली, त्यावर न्यायनिवाडा झाला असे स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी दिले.
ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेवर टीका करताना दादा भुसे यांनी ही स्टंटबाजी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आपला देश घटना आणि कायदा यावर चालतो. अध्यक्ष महोदय यांच्या समोर जी कागदपत्रे ठेवली, त्यावर न्यायनिवाडा झाला. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला पक्षाचा मेळावा किंवा सभा म्हणायला हवा होती. काही वकील महोदयांनी राजकीय भाषण बाजी केली. काही लोकांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेले, मग ही स्टंटबाजी का ? तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर देखील टीका केली. म्हणजे तुम्ही सर्वोच्च झाला का ? एक वेळ असा होता, की मातोश्रीवर लोकं स्वतः यायचे आता त्यांना दुसरीकडे जावं लागतं. अशी बोचरी टीका दादा भुसे यांनी केली.
पुढे त्यांनी मोदी यांनी नाशिक दौऱ्या दरम्यान केलेल्या स्वच्छतेच्या आवाहनावर भाष्य केले. 12 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नाशिकमध्ये आले होते. त्यांनी स्वच्छता करण्याचे आदेश आणि मार्गदर्शन केले. गोदावरी नदीची स्वच्छता करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये लोकसहभाग देखील घेतली जाईल. गोदावरी नदीत दूषित पाणी मिसळणार नाही, याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू दूषित पाणी मिश्रित होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले,
जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण पेटले आहे. यावर आता दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर काही संस्था बाबत नागरिकांना आदर आहे. त्यात सैनिक, न्यायव्यवस्था यांचा समावेश आहे.न्यायव्यवस्थेवर प्रश्न उभे करणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याची टीका दादा भुसे यांनी केली.