
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर (Varsha Bunglow) आज शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपच्या (BJP) सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा (Dinner) कार्यक्रम आयोजित केला आहे. परंतु, या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) उपस्थित राहू शकणार नाहीत. मंत्रिपदावरुन त्यांच्या नाराजीची पुन्हा चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी मतदारसंघात माझे आधीच कार्यक्रम ठरले आहेत. त्यामुळे आज मुंबईला जाता येणार नाही, असे सांगितले. तसेच, याचा अर्थ मी नाराज आहे, असा काढू नये, असे आवाहनही केले. गणेशोत्सवानिमित्त वर्षा बंगल्यावर आज शिंदे गट आणि भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. त्यामुळे सदर सर्व आमदार हजर राहणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना कार्यक्रमास हजर राहण्याची विनंती केली आहे. तरीदेखील संजय शिरसाट कार्यक्रमास जाणार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गैरसमज करुन घेऊ नये
संजय शिरसाट यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी आज जाणार नाही, याचा अर्थ मी नाराज आहे, असे नाही. कृपया असा गैरसमज करुन घेऊ नये. मतदारसंघात गणेशोत्सवाचे काही कार्यक्रम पूर्वीच ठरले होते. याबाबत मी मुख्यमंत्री शिंदेंनाही कळवले आहे. त्यांनीही परवानगी दिली आहे. त्यांनी परवानगी दिली नसती आणि वर्षावर महत्त्वाचा कार्यक्रम असता तर मी नक्की गेलो असतो, असे त्यांनी सांगितले.
यापुढे या विषयावर भाष्य नाही
मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार कधी होईल, याची मला कल्पना नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार किंवा माझ्या मंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाही. मंत्रिपदावरुन नाराजी वगैरेचा भाग आता संपला आहे. यापुढे या विषयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. शिंदेसाहेब जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल.