आता शिवभोजनही अडचणीत
मुंबई : राज्य सरकारची आर्थिक घडी कोलमडली आहे आणि त्याचा थेट फटका सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना बसणार आहे. गेली दोन वर्षे दसरा-दिवाळीसारख्या सणांमध्ये देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. एवढंच नाही तर गरीबांना स्वस्तात जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना देखील संकटात सापडली आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी याबाबतची धक्कादायक माहिती दिली. राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, त्यामुळे ‘आनंदाचा शिधा’ यंदा वाटण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना २०२२ मध्ये दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदा राबवली गेली. किटमध्ये चना डाळ, साखर आणि खाद्यतेल अशा तीन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. पुढील काळात गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गौरी-गणपती, दिवाळी, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि शिवजयंती अशा प्रसंगीही या किट्सचे वितरण झाले होते. पण, आता याचं वाटप करण्यात अडचणी येत आहेत.
हेदेखील वाचा : Shivsena News: अकोलेत चक्क ‘पक्षप्रवेश घोटाळा’! बोगस यादीमुळे शिंदे गट अडचणीत, नगरमधील पक्ष प्रवेशावर संशयाची सावली
शिवभोजन योजनेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘ही योजना सुरू ठेवण्यासाठी ६० कोटींची गरज आहे. मात्र, सरकारकडून केवळ २० कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आता अनेक शिवभोजन केंद्रे बंद करावी लागणार आहेत. काही केंद्रांमध्ये गैरप्रकारही उघडकीस आले आहेत. यापुढे नव्या केंद्रांना मंजुरी मिळणार नाही. थाळ्यांची संख्याही कमी होणार. हे सगळं सांगताना भुजबळ यांनी सरकारची आर्थिक विवंचना मान्य केली’.
‘लाडकी बहीण’मुळे तिजोरीवर ताण
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे आधीच तिजोरीवर ताण आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. “महिलांसाठी ही योजना अत्यंत गरजेची आहे, पण उत्पन्न वाढत नाही तोवर खर्चाला मर्यादा आणाव्या लागणार,” असेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती