शिंदे गटात बोगस पक्षप्रवेश, मारूती मेंगाळेचा पक्षप्रवेश घोटाळा उघड
Eknath Shinde Shivsena News: भारतासह जगभरात अनेक अनपेक्षित घोटाळे समोर येत असतात. कधी आर्थिक घोटाळे, कधी सरकारी योजनांमधील घोटाळे तर कधी नोकरीतील घोटाळे, असे अनेक प्रकारचे घोटाळे होत असतात. पण महाराष्ट्रात मात्र वेगळाच घोटाळा आता समोर आला आहे. तो म्हणजे पक्षप्रवेश घोटाळा. या पक्षप्रवेशाच्या घोटाळा प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेश घोटाळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आदिवासी नेते मारूती मेंगाळ यांचे नाव समोर आले आहे.
अकोले तालुक्यातील ठाकर समाजाचे प्रभावी नेते म्हणून मारूती मेंगाळ यांची ओळख आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अकोले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आणि इथर पक्षाच्या पदाधिकारी आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचेही बोलले जाऊ लागले. पण त्याचवेळी त्यांच्या विभागात संभ्रमाचेही वातावरण होते.
पोलिसांवरील राजकीय दबाव स्पष्ट…; कोथरुडच्या तरुणींना पोलिसांकडून मारहाण प्रकरणी रोहित पवार संतापले
पण मारूती मेंगाळ यांनी केलेल्या याच शक्तीप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पक्षप्रवेश यादीत अनेक बनावट नावांचा समावेश असल्याचा आरोप या यादीतील व्यक्तींनी केला आहे. या यादीत समावेश असलेल्या काही लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत आपण पक्षात प्रवेश केलाच नसल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच, त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोपही या व्यक्तींकडून केला जात आहेत.
हे प्रकरण उजेडात आल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. ” मेंगाळ यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहित पक्षाकडे आधीपासून नव्हती, पण काही दिवसांपूर्वी यादी समोर आल्यानंतर शहानिशा केली असता यातील ४० ते ५० नावे बोगस असल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करणारा असून त्यावर कठोर निर्णय घेण्यात यावा,’ अशी मागणीही दराडे यांनी केली आहे.
Mumbai Crime : बायकोसमोरच भाऊजींनी मेहुणीवर केला बलात्कार! वर्षभरात घरीच मुलाला जन्म
येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक मारुती मेंगाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मेंगाळ यांच्यावर पक्ष प्रवेशासंदर्भात कथित घोटाळ्याचे आरोप झाले असून, त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे स्थानिक पातळीवरील काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश देताना केवळ सामाजिक आधार नव्हे, तर पारदर्शकतेचे निकषही पाळावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेतात, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.