
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
फडणवीस म्हणाले की, ‘येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. ‘ मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर विरोधकांनी समोरून काही टिप्पणी केली. ज्यावर फडणवीस म्हणाले की, ‘काळजी करू नका.. तुमच्या मनातील एक-एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार.. फक्त कोर्टात जाऊ नका. योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका.’
‘लखपती दिदी’बद्दलही फडणवीसांची मोठी घोषणा
लखपती दीदींविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एक महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल. महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियानातंर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे.’
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ३० सप्टेंबर 2025 पर्यन्त पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. यामुळे ज्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज थकीत आहे त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार, कर्जमाफीसाठी दीर्घकालीन योजना केल्या जाणार आहेत.