संजय राऊत म्हणजे...; 'नरकातील स्वर्ग' पुस्तकावरुन शहाजी पाटलांचा निशाणा
सोलापूर : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबत गौप्यस्फोट करणारे प्रसंग लिहिले आहेत. अशातचं आता शिवसेनेचे नेते शहाजी पाटील यांची राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणजे विनाकारण काहीही बिनबुडाचे वक्तव्य किंवा आरोप करून सणसणाटी निर्माण करणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रकारचा नरकातील किडाच आहे, अशी बोचरी टीका पाटील यांनी संजय राऊत लिखित ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकावरुन केली आहे.
खासदार संजय राऊत लिखित नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात राज्याच्या राजकारणात सणसणाटी निर्माण करणाऱ्या अनेक वादग्रस्त घटनांचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. यावर माजी आमदार शहाजी पाटील पत्रकार परिषदेतून बोलत होते.
संजय राऊत हे महाराष्ट्राने दुर्लक्षित केलेले आणि नाकारलेले नेते आहेत. त्यांचा दररोजचा सकाळी वाजणारा भोंगा बंद करण्यासाठीच महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेत महायुतीला विक्रमी बहुमत दिले. तरीही, संजय राऊत ‘गिरे तो भी टांग उपर’ या उक्तीप्रमाणे सतत वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाला त्यांनी ‘नरकातला किडा’ असे नाव द्यायला हवे होते असा खोचक टोलाही या पत्रकार परिषदेतून शिवसेना उपनेते शहाजी पाटील यांनी लगावला.
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना हरताळ फासला. मी माझ्या पक्षाला काँग्रेस होऊ देणार नाही आणि तशी वेळ आली तर मी राजकारण सोडेन असे सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे महापाप ज्यांनी केले त्यांनी स्वर्ग आणि नरक यांच्या गप्पा मारू नयेत, असा टोलाही शहाजी पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.