
शंभूराज देसाईंच्या बूस्टर डोसने शिंदेंची शिवसेना चार्ज; कार्यकर्त्यांमध्ये संचारली नवी ऊर्जा
मेढा/ दत्तात्रय पवार : शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील कार्यक्रमात आक्रमकपणे शिवसेनिकांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. देसाईंच्या या बुस्टर डोसने जावली तालुक्यातील शिवसेना चांगलीच चार्ज झाली आहे. त्याचा प्रथम प्रत्यय मेढा नगरपंचायत निवडणुकीत दिसून येणार असूून देसाई यांच्या बूस्टर डोसने तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवऊर्जा संचारली आहे.
शनिवारी एकनाथ शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांना बळ देत विरोधकांकडून व महायुतीतीलच काही घटक पक्षातील नेत्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगत यावर मंत्री देसाई चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आपल्या भाषणातून या गोष्टींचा समाचार घेत कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा. अशी थेट तंबी व्यासपीठावरून दिली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देसाईंमुळे चार हत्तींचे बळ संचारले आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये कार्यकर्ते कामाला लागले असून, याचा प्रथम प्रत्येय मेढा नगरपंचायत निवडणुकीत दिसून येणार आहे.
शिवसेना शिंदे गटाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचे मायक्रो प्लानिंग केले असून, त्यामुळे महायुतीतीलच भाजप पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिंदे गटाचे नेते अंकुश कदम मैदानात उतरले असून, त्यांनी नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
अंकुश कदम यांच्या नेतृत्वात सेना एकवटली
जावलीचे सुपुत्र व नवी मुंबई संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अंकुश कदम (बाबा) यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जावली तालुक्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना एकवटलेली पाहायला मिळत आहे. नवतरुणांची एक मोठी फळी त्यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागली आहे. त्यामुळे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शिवसेना आपले अस्तित्व दाखवून देईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
महायुतीतील घटक पक्षांना विचारात घ्यावे लागणार
सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जावली तालुक्यात शिवसेना मजबूत होत आहे. मेढा नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लढवताना भाजपचे जावली तालुक्यावर प्राबल्य जरी असले तरी शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊनच या निवडणुका लढवाव्या लागतील अन्यथा शिंदे गट भाजप विरोधी इतर पक्षांची मोट बांधून भाजप पक्षाच्या व पक्ष नेतृत्वाच्या अडचणीत वाढ करेल, अशी परिस्थिती आहे.