संग्रहित फोटो
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून मशाल चिन्हावर स्वतंत्र लढविणार असल्याचे उपनेते शरद कोळी यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असतात. गावच्या शाखा प्रमुखाला मान सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी आजपर्यंत पक्षासाठी त्याग केलेल्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पेनुर येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ते मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मोहोळ विधानसभा प्रमुख तुकाराम माने, वक्ते बाळासाहेब वाघमोडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक सिद्धाराम म्हमाणे, माथाडीचे कयूम शेख, उपतालुकाप्रमुख दिलीप टेकाळे, विभाग प्रमुख नाना हावळे आदी उपस्थित होते. यावेळी शंकर सातपुते, विनोद भोसले, लिंगराज होनमाने, अमोल पाटील, राजकुमार पांढरे, मनोज नागणे, विष्णू कदम, संतोष आवताडे, भागवत मुळे, गोरख पवार, काशिनाथ हाक्के, बिरू कोकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
नेत्यांचे शिवसैनिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष
दरम्यान तालुक्यातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सामान्य शिवसैनिकांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत व पक्ष वाढीसाठी कोणतेही कार्यक्रम राबविले नसल्याचे मत शिवसैनिकांनी मांडले. तालुक्यात पुन्हा शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता मेळावा आयोजित करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
खासदार, आमदारांना उपकाराचा विसर
काेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकी दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांना केलेल्या उपकाराची परतफेड करण्याऐवजी शिवसैनिकांना त्रास देण्याचा काम केलं तर मोहोळ विधानसभेला आमदार राजू खरे यांना केलेली मदत ते विसरून गद्दार शिंदे गटात गेले. या पुढील काळात आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.






