
Govind Pansare, Shivaji Kon Hota, Copyright Dispute,
‘Shivaji Kon Hota’ Book Copyright Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘शिवाजी कोण होता’ हे
हे मराठी पुस्तक वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या वरून राजकीय वाद निर्माण झाला होता. हा वाद निवळत नाही तोच पुस्तक पुन्ह एकदा चर्चेत आले आहे. दिवंगत डावे नेते आणि लेखक गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकासंदर्भात आता कॉपीराइटचा वाद निर्माण झाला होता. पानसरे कुटुंबीयांनी कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर, पुण्यातील प्रकाशकाने पुस्तकाच्या सुमारे ४५,००० प्रती नष्ट केल्या आहेत. या प्रकरणामुळे साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दिवंगत लेखकांच्या पत्नी उमा पानसरे आणि स्मिता पानसरे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील प्रकाशन संस्थेवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुस्तक प्रकाशित करण्याचे हक्क उमा पानसरे यांच्याकडे असतानाही त्यांची परवानगी न घेता पुस्तकाची छपाई करण्यात आली. तसेच मूळ मजकुरात बदल करून काही महत्त्वाचे अध्याय वगळल्याचाही आरोप करण्यात आला.
कुटुंबीयांनी हा केवळ कॉपीराइटचा प्रश्न नसून लेखकाच्या मूळ लिखाणाशी छेडछाड झाल्याचा मुद्दा असल्याचे सांगितले. पुस्तकातील काही भागांमध्ये बदल करण्यात आल्याने लेखकाच्या विचारांचे चुकीचे सादरीकरण होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.
पुण्यातील प्रकाशन संस्था मधुश्री पब्लिकेशन्स चे प्रमुख शरद अष्टेकर यांनी या प्रकरणात आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी सांगितले की, पुस्तकाची पीडीएफ ऑनलाइन उपलब्ध असल्याने त्यावर आधारित छपाईचा निर्णय घेण्यात आला होता. अष्टेकर म्हणाले की, पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत कमी किमतीत पोहोचावे हा उद्देश होता. मात्र, मूळ आवृत्तीची पडताळणी न करता छपाई सुरू करणे ही कायदेशीर आणि संपादकीय चूक ठरली. ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ छपाई थांबवून सुमारे ४५ हजार प्रती नष्ट करण्यात आल्या.
या प्रकरणामुळे प्रकाशन क्षेत्रात कॉपीराइट हक्क, लेखकांच्या वारसांची परवानगी आणि साहित्यिक कृतींच्या पुनर्प्रकाशनासंबंधीच्या नियमांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. लेखकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्याचे हक्क संबंधित वारसांकडे राहतात आणि पुनर्प्रकाशनापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक यापूर्वीही विविध राजकीय आणि वैचारिक वादांमुळे चर्चेत राहिले आहे. आता कॉपीराइट आणि मजकूर बदलाच्या आरोपांमुळे हा वाद आणखी गडद झाला असून पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.