
Shivbhojan Thali
मुंबई : राज्यातील गरीब, मजूर आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात जेवण देणाऱ्या शिवभोजन योजनेत (Shivbhojan Yojana) सरकारने मोठे बदल केले आहेत. योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि केंद्रांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून नवी सर्वसमावेशक नियमावली जारी करण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार शिवभोजन केंद्रांवर CCTV बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रातील भोजन वितरणाच्या वेळेतील किमान 90 दिवसांचं CCTV फुटेज जतन करून ठेवावं लागणार आहे. तपासणीच्या वेळी अधिकाऱ्यांनी फुटेज मागितल्यास ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्रचालकाची असेल.
शिवभोजन थाळीची लाभार्थ्यांसाठीची किंमत 10 रुपये इतकीच राहणार आहे. उपलब्ध माहितीनुसार शहरी भागात थाळीचं मूल्य 50 रुपये, तर ग्रामीण भागात 35 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून अनुदानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अलीकडील जिल्हास्तरीय माहितीनुसारही नागरिकांना 10 रुपयांत दोन पोळ्या, भाजी, वरण आणि भात दिला जातो.
शिवभोजन केंद्रांची वेळही निश्चित करण्यात आली आहे. केंद्रे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सुरू ठेवावी लागतील. प्रत्येक केंद्रावर दररोज किमान 75 आणि कमाल 200 थाळ्यांचं वितरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच एका वेळी किमान 25 व्यक्तींना बसता येईल, अशी व्यवस्था असणं आवश्यक आहे.
दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांसह आलेल्या महिलांना रांगेत जास्त वेळ थांबावं लागू नये, यासाठी त्यांना प्राधान्याने भोजन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवभोजन केंद्रातील जेवण बाहेर पार्सल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रात बाहेरचं अन्न आणण्यासही मनाई करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी आणि संबंधित आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना या सवलतीच्या थाळीचा लाभ घेता येणार नाही.
नियमभंगावरही सरकारने कडक भूमिका घेतली आहे. केंद्र वेळेवर न उघडणे किंवा स्वच्छतेच्या नियमांचं पालन न करणं यासारख्या किरकोळ बाबींमध्ये कारणे दाखवा नोटीस दिली जाऊ शकते. CCTV बंद असणे किंवा पूर्वसूचना न देता केंद्र बंद ठेवणे यांसारख्या गंभीर प्रकारात दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
तर शिळं किंवा निकृष्ट दर्जाचं जेवण देणे अथवा दुबार फोटो अपलोड करण्यासारखा अतिगंभीर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मंजुरी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रचालकांवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाढली आहे.