सातारा : कास धरणाचे वाढीव पाण्याची सातारकरांना वाट बघावी लागणार आहे. अद्याप वाढीव पाईपलाईनचा पत्ता नाही. याला पालिकेचा नियोजनशून्य भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरू झाल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकामध्ये नमूद आहे की, विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालय विभागाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन त्यांना कास बंदिस्त पाईपलाईनची सुधारणा व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळवून देण्यासाठी निवेदन दिले. यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार टीका केली आहे.
पत्रकात पुढे ते म्हणतात की, गेली पाच-सहा वर्ष पालिकेत मनमानी व नियोजन शून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. टेंडर, टक्केवारी, कमिशन यासाठी एकमेकांचे गळे धरून मारामाऱ्या करून पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरणं बनविले गेले. पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम पालिकेत सुरू होता. आता निवडणूक आली की मंजूर नसलेल्या व न होणाऱ्या योजना राबवायच्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांची नारळ फोडायचे मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन द्यायचे फोटोसेशन करून सातारकरांना बोलवायचे हे प्रकार जोमाने सुरू झाले आहेत.