सातारा : खासदारांनी जावली तालुक्यात (Javali Taluka) सुरू केलेले दौरे ही चांगली गोष्ट आहे. किमान 15 वर्षानंतर ही लोकांना कळेल की खासदारकीला कोणाला निवडून दिले होते. मात्र, या दौऱ्यांचा काही उपयोग नाही. गाठीभेटी घेणे, मिठ्या मारणे, याची वेळ आता निघून गेलेली आहे. पुलाखालून पाणी नाही तर पूलच पाण्याखाली गेलेला आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Singh Raje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर जावली दौऱ्यावरून केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली कुडाळ येथे गायरान जमिनीच्या दहा गुंठे जागेवर स्मशानभूमी उभी करण्यात यावी, याविषयीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव झेडपीच्या माध्यमातून आम्हाला सादर करा. त्याबाबत सहकार्य करू, असे आश्वासन दिले. तसेच राजकीय दबावातून सातारा मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडण्यात आले होते. त्यामुळे या कामांना संरक्षण देण्यात यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कॉलेजच्या कामाला संरक्षण देणे गरजेचे आहे. शहरातील राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काही कार्यकर्त्यांनी जाऊन मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडले. या मागचा त्यांचा हेतू काय होता हे समजू शकले नाही. यातून आर्थिक मागणी होऊ नये आणि कोणतेही राजकारण आडवे येऊ नये हा आमचा हेतू आहे. खिंडवाडी येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे. त्याची रॉयल्टी भरण्यात आलेली नाही आणि देण्यात आलेली नाही. त्याची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.