मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. यामध्ये भाजपला राज्यामध्ये व देशामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला बहुमताचा आकडा देखील गाठता आला नाही. यामुळे भाजपला मित्रपक्षांवर अवलंबून रहावे लागले आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्र भाजपच्या राजकारणामध्ये एकच खळबळ सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यानंतर राज्य सरकारमध्ये चर्चांना उधाण आले असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून संजय राऊत यांनी खोचक सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
संजय राऊत यांची खोचक पोस्ट
खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन टीकास्त्र डागलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी टोला लगावला आहे. “मी पुन्हा येईन…पुन्हा येईन.. लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन, असे गळा फ़ोडून सांगणारे आता…मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा…अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान. महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र!” अशी खोचक पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे.
मी पुन्हा येईन…पुन्हा येईन..
लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन
असे गळा फ़ोडूनसांगणारे
आता:
मला जाऊदे ना घरी
वाजले की बारा
अशी रेकॉर्ड लावत आहेत.
छान
महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणारनाही.
अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत
जय महाराष्ट्र!@BJP4Mumbai… https://t.co/RY0bm96tHQ— Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2024
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या लोकसभेच्या निकालानंतर पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला. फडणवीस म्हणाले, “भाजपाला महाराष्ट्रात ज्या परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या त्या सगळ्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो आहे. महाराष्ट्रात अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे. मी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. ते जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढचे काम करीन,”असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली.