
Siddhivinayak Trust : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाप्पा धावला! मुख्यमंत्री सहायता निधीला दिली 10 कोटींची मदत
महाराष्ट्रातील विविध भागांत दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने (Siddhivinayak Trust) पुढाकार घेतला आहे. न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीत 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. या मदतीमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि प्रभावित कुटुंबांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला. सोमवारी न्यासाच्या वतीने 10 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. न्यासाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री दर्जा प्राप्त सदानंद सरवणकर तसेच कोषाध्यक्ष आचार्य पवनकुमार त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांना हा धनादेश दिला.
या वेळी न्यासाच्या विश्वस्त मीना कांबळी, महेश मुदलियार, गोपाल दळवी, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, सुदर्शन सांगळे आणि कार्यकारी अधिकारी राखी चव्हाण उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांना मदत करणे ही सामाजिक बांधिलकी असल्याचे मंदिर न्यासाने म्हटले आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि बाधित कुटुंबांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे. न्यासाच्या या योगदानामुळे राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
यापूर्वी महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठीही सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीत 10 कोटी रुपयांचे योगदान देण्याची घोषणा केली होती. 29 सप्टेंबर रोजी न्यासाने याबाबत अधिकृत ‘एक्स’ खात्यावर प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली होती. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेण्याची न्यासाची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.
राज्यात सध्या दुष्काळाचं सावट असून अनेक संस्था व व्यावसायिक मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमेल तशी मदत करत आहेत. या सहाय्यता निधीतून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहे.
Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?
Ans: श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीत 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली.
Ans: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हे योगदान देण्यात आले आहे.
Ans: न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर आणि कोषाध्यक्ष आचार्य पवनकुमार त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.