
मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; एक-दोन नव्हेतर तब्बल 154 प्राणी जप्त
मुंबई : सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ठाणे येथील एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. आरोपीकडे १५४ विदेशी वन्यप्राणी सापडले असून, या कारवाईत अॅनाकोंडा, सरडे, कासवासह १५४ प्राणी ताब्यात घेण्यात आले. या सर्व प्राण्यांना मूळ देशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित महिला प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. महिलेच्या सामानाची तपासणी केली असता त्यात वन्यप्राणी लपवल्याचे आढळले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे प्राणी ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारांसाठी रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेकडे सुपूर्द केले, यामध्ये विविध प्रकारच्या संकटग्रस्त यादीत असलेल्या प्रजातींचा समावेश आहे.
या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या वन्य प्राणांमध्ये कासव, इग्वाना, सरडे, रकून, अॅनाकोंडा या प्रजातींचा समावेश आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली असून, तस्करी केलेल्या प्राण्यांचे मूळ आणि हेतू निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकॉकवरून सर्वाधिक वन्यजीव तस्करी
थायलंड हा दुर्मिळ वन्यजीव प्राण्याचे अस्तित्व असलेला सर्वांत मोठा देश आहे. तेथे मोठ्या प्रमाणात असे ‘एक्झॉटिक प्राणी पाळले जातात. थायलंडमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे देश-विदेशातील विक्रेते आणि तस्कर थायलंडमध्ये येत असतात. ऑनलाईन आणि समाज माध्यमाद्वारे ते स्थानिक विक्रेते आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी सहज संपर्क साधतात.
औषधांसाठीही वन्यप्राण्यांचा केला जातो वापर
अनेक देशातून खास आणि दुर्मिळ प्रजातीच्या वन्यजीशना मोठ्या प्रमाणावर मागणी असते, अशा प्राण्यांचा पाळण्यासाठी, खेळासाठी, तसेच औषधासाठी वापर करण्यात येतो. बँकॉकमधून थेट विमान सेवा असून तेथून वन्यजीव आणणे किफायतशीर असल्याचेही रॉचे संचालक पवन शर्मा यांनी सांगितले.