
Solapur firecracker
Solapur News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाके विक्री स्टॉलच्या नियोजनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा वीर सावरकर मैदान आणि चार हुतात्मा पुतळ्यामागील पार्क स्टेडियम येथे उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसारच फटाके स्टॉल उभारण्यास परवानगी देण्यात येणार असून, उर्वरित स्टॉलधारकांना होम मैदानावर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढील वर्षापासून शहरातील सर्व फटाके विक्री स्टॉल होम मैदानावर स्थलांतरित करण्याबाबत फटाके स्टॉल असोसिएशनने सहमती दर्शविली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दिवाळीच्या काळात फटाके खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे स्टॉलची उभारणी करताना नागरिकांची सुरक्षितता, अग्निशमन यंत्रणेला मिळणारा प्रवेश, आवश्यक मोकळी जागा आणि शासनाच्या नियमांचे पालन या बाबींना प्राधान्य देण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. उपलब्ध जागेपेक्षा अधिक स्टॉल उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होऊन जीवितहानीचा धोका संभवतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या निकषांशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे महापौर कोंड्याल यांनी बैठकीत सांगितले.
वीर सावरकर मैदान आणि चार हुतात्मा पुतळ्यामागील पार्क स्टेडियम येथे दरवर्षी फटाके विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, या दोन्ही ठिकाणांची क्षमता मर्यादित असल्याने यंदा नियमानुसार सुरक्षितपणे जितके स्टॉल उभारता येतील, तितक्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. या ठिकाणी पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या अधिकृत स्टॉलधारकांची नावे असोसिएशनने महापालिकेला सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना! सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये
विशेषतः वीर सावरकर मैदान आणि चार हुतात्मा पुतळ्यामागील ठिकाणी पूर्वीपासून स्टॉल लावणाऱ्या व्यावसायिकांची नावे असोसिएशनकडूनच उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार पात्र जुन्या स्टॉलधारकांना जागा देण्याचे नियोजन केले जाईल. उपलब्ध जागेची क्षमता निश्चित करून त्यानंतरच स्टॉलचे अंतिम वाटप करण्यात येणार असल्याने स्टॉलधारकांच्या यादीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
फटाके विक्रीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वाहनांना सहज ये-जा करता यावी, यासाठी पुरेशी जागा ठेवणे आवश्यक आहे. स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर राखणे, गर्दीचे योग्य नियोजन करणे आणि विक्रेत्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, यावरही बैठकीत चर्चा झाली. महापालिका प्रशासनाकडून सर्व नियमांची पूर्तता झाल्यानंतरच स्टॉल उभारणीस परवानगी देण्यात येणार आहे.
महापौर कोंड्याल यांनी सांगितले की, फटाके विक्रीच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. स्टॉलची संख्या वाढविण्यापेक्षा नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. नियमबाह्य पद्धतीने स्टॉल उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध जागेचा विचार करूनच परवानगी दिली जाईल.
फटाके विक्रेत्यांनी दिवाळीच्या सुमारे तीन महिने आधीपासून माल खरेदी करून व्यवसायाची तयारी केलेली असते. अशा वेळी यंदाच सर्व स्टॉल अचानक स्थलांतरित केल्यास विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा जुन्या ठिकाणांवरील उपलब्ध क्षमतेनुसार स्टॉलधारकांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित विक्रेत्यांना होम मैदानावर जागा दिली जाणार आहे. मात्र, पुढील वर्षापासून सर्व स्टॉल एकाच ठिकाणी म्हणजेच होम मैदानावर हलविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडळवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुरी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, अग्निशमन विभागप्रमुख राकेश साळुंखे यांच्यासह फटाके स्टॉल असोसिएशनचे सुनील रसाळे, बसवराज येरटे, गौरव बेंद्रे, अनिल सावंत, सुनील कत्ते, सन्मित्र काटकर, बाळासाहेब दर्गोपाटील, मनोज जगताप, सुरेश चंद्रगुप्ता, माऊली भोजरंगे, गणेश साठे, अंकिता भुजंग, गणेश घाडगे आदी उपस्थित होते.
Bhimashankar मध्ये वृक्षतोड सुरू आहे की नाही? उडालेल्या संभ्रमानंतर वन विभागाकडून झाला ‘हा’ खुलासा