
firecracker shop representative image
Wai News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीसाठी शासनाने आणि संबंधित प्रशासनाने कठोर सुरक्षा नियम व अटी घालून दिल्या असतानाही वाई तालुक्यात या नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. फटाके विक्रीच्या ठिकाणी सुरक्षिततेचे निकष पाळले जात आहेत की नाहीत, याची प्रत्यक्ष तपासणी कोण करणार आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
फटाक्यांच्या विक्रीसाठी उभारण्यात येणारे शेड ज्वलनशील पदार्थांपासून दूर, सुरक्षित आणि अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करता येणार नाहीत अशा पद्धतीने असणे बंधनकारक आहे. दोन शेडमध्ये किमान तीन मीटर अंतर, तसेच संरक्षित वास्तू अथवा ठिकाणापासून किमान ५० मीटर अंतर असणे आवश्यक आहे. एका समूहात ५० पेक्षा अधिक दुकाने ठेवण्यासही मनाई आहे. मात्र, हे नियम प्रत्यक्षात कितपत पाळले जात आहेत? हा खरा प्रश्न आहे.
फटाका विक्रीच्या परिसरात उघडे दिवे, कंदील, मेणबत्त्या, धूम्रपान यांना स्पष्ट मनाई असतानाही त्याबाबत पुरेशी दक्षता घेतली जाते का? विद्युत जोडणी सुरक्षित आहे का? प्रत्येक दुकानाच्या रांगेसाठी स्वतंत्र स्विच आणि मुख्य स्विचची व्यवस्था आहे का? दुकानांसमोर फटाक्यांचे बॉक्स, रिकामे खोके अथवा ज्वलनशील साहित्य पडलेले नाही ना याची प्रशासनाकडून काटेकोर पाहणी होते आहे का? फक्त परवानगी देऊन प्रशासनाची जबाबदारी संपते का? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
दुकानामध्ये अनावश्यक साठा तसेच ग्राहकांची गर्दी होऊ नये, दुकानात १३ पेक्षा अधिक ग्राहक ठेवू नयेत, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे खुला ठेवावा, पुरेशा संख्येने अग्निशामक यंत्रे व पाण्याच्या बादल्या उपलब्ध ठेवाव्यात, विक्रेते व कामगारांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण असावे, अशा स्पष्ट अटी असतानाही या अटींची अंमलबजावणी प्रत्यक्षात होते आहे की केवळ कागदोपत्री असा सवाल विचारला जात आहे.
विशेष म्हणजे, फटाक्यांच्या विक्रीसाठी LE-3 व LE-5 परवान्यांतील अटी तसेच Explosives Rules, 2008 मधील संबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. क्लोरेटयुक्त प्रतिबंधित फटाक्यांची विक्री व साठवणुकीवरही निर्बंध आहेत. अधिकृत उत्पादकाचे लेबल, वापराच्या सूचना आणि सुरक्षिततेची माहिती असलेलेच फटाके विकणे आवश्यक आहे. याशिवाय ध्वनिप्रदूषणाबाबतही निर्धारित मर्यादांचे पालन बंधनकारक आहे.
१२५ dB(AI) पेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर निर्बंध असताना प्रत्यक्ष बाजारात विक्री होणाऱ्या फटाक्यांची तपासणी कोण करणार? आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी प्रशासनाकडे यंत्रणा आहे का? की दिवाळीच्या उत्साहात नियमांचा आवाजच दाबला जात आहे अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर फटाके हे अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक स्वरूपाचे असल्याने विक्रीच्या ठिकाणी अग्निसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित आहे.
एखादी दुर्घटना घडल्यास काही मिनिटांत मोठी आग भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फटाके विक्रीसाठी जागा निश्चित करताना अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, दुकानांमधील अंतर आणि गर्दी नियंत्रणाची व्यवस्था यांची प्रत्यक्ष पाहणी झाली आहे का? याचे उत्तर प्रशासनाने जनतेसमोर देणे गरजेचे आहे. आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था एकीकडे प्रशासनाकडून नियमांची लांबलचक यादी जाहीर केली जाते आणि दुसरीकडे प्रत्यक्ष बाजारपेठेत त्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो.
नियम मोडले जात असतील तर कारवाई का होत नाही? तपासणी पथके कुठे आहेत? परवान्यांची प्रत्यक्ष पडताळणी झाली आहे का अग्निशमन विभागाचा अहवाल घेतला आहे का ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था निर्माण झाली तर उद्या एखादी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाई तालुक्यात फटाके विक्रीच्या ठिकाणांची तातडीने संयुक्त पाहणी करून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ कागदावर नियम दाखविण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करण्याची वेळ आता आली आहे नियम जनतेसाठी आहेत की फक्त कागदासाठी फटाके विक्रेत्यांना परवानगी देताना सुरक्षा कुठे आहे आणि प्रशासनाचा वचक नेमका कुठे हरवला आहे या प्रश्नांची उत्तरे आता वाईकरांना प्रशासनाकडून अपेक्षित आहेत.
धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू