
FDA
Solapur News : गणेशोत्सव व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने सणासुदी मोहिमेअंतर्गत धडक तपासणी मोहीम राबवली आहे.
या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मंगेश लवटे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील मे. अभिनव स्नॅक्स, जयसिंह चौक, बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर या आस्थापनेची तपासणी करून अन्न नमुने घेतले आहेत. सदर पेढीमध्ये तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सदर आस्थापनेस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थ साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग व इतर घटकांची गुणवत्ता याबाबत काटेकोर तपासणी करण्यात आली.
सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी पूर्ण केली.
तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे नियमांचे पालन करावे, तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तपासणीवेळी आढळून आल्यास योग्य ती कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, सोलापूर यांनी केले आहे.