(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Solapur News: पंढरपूर (वा.) डिझेलच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि प्रक्रिया खर्चाचा वाढलेला भार लक्षात घेता राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे. यासोबतच दुग्धजन्य उपपदार्थांच्या किंमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
मात्र, ग्राहकांना दूध महाग मिळणार असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खरेदी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दूध संघांच्या हिताचा विचार झाला; मात्र दूध देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील दूध उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.
Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई …
दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना ग्राहकांकडून मात्र दूध विक्री दर वाढवून अधिक पैसे घेतले जात आहेत. या दरवाढीचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. दूध उत्पादन हा आता नफ्याचा नव्हे, तर तोट्याचा व्यवसाय बनत चालला असल्याची संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दुग्धविकास मंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दूध खरेदी दरात वाढ जाहीर करावी, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमती, चाऱ्याची टंचाई, औषधोपचार आणि मजुरीचा वाढलेला खर्च लक्षात घेता दूध उत्पादकांना प्रतिलिटर अधिक दर देणे आवश्यक असल्याचे मत दुग्ध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
“ग्राहकांकडून वाढीव दर, मग शेतकऱ्यांना वाढ कधी?” असा सवाल आता दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.
A1 And A2 Milk : तुम्ही कोणतं दुध पिता A1 की A2 ? हा प्रकार नेमका आहे …
दूध भेसळीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र असले तरी भेसळ करणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्याची मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे. भेसळखोरांविरोधात धडक मोहीम अधिक तीव्र केल्यास शुद्ध दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा दूध उत्पादकांनी व्यक्त केली आहे.






