उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मरोळमधील विकास कामांचे भूमिपूजन आज पार पडले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकास प्रकल्पांचा पाढा वाचून दाखवला आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात असलेल्या स्थगिती सरकारने टाकलेले स्पीड ब्रेकर महायुती सरकारच्या काळात दूर केले आणि विकास प्रकल्पांना चालना दिली असे मत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मरोळ येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या विविध विकास कामांचे आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार मुरजी पटेल यांच्या पुढाकाराने पाच मजली रुग्णालय इमारत व पाच मजली मार्केट कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. आज या बांधकामाचे शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की हे सर्व प्रकल्प मागील ३० वर्षांपासून रखडले होते, परंतु महायुती सरकारने एकाच बैठकीत यावर निर्णय घेतला. आमच्या कार्यपद्धतीचा मंत्र म्हणजे ‘नो रिझन, ऑन-द-स्पॉट डिसिजन त्यामुळे संपूर्ण मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळाली असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात उपस्थित महिलांना ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना आश्वस्त केले आहे. लवकरच मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकार शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे असे ते म्हणाले.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला ‘ग्रोथ सेंटर’ असे संबोधले आहे. आमचे सरकार रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी कार्यरत आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई सोडून गेलेल्या नागरिकांना ते पुन्हा परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत असे ते म्हणाले.
राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या विकासात्मक कार्यप्रणालीने प्रभावित होऊन विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते दररोज शिवसेनेत सहभागी होत आहेत असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी अंधेरी पूर्वमधील ठाकरे गट आणि इतर पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.