ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: रमी जुगारप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.आव्हाड म्हणाले की, विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. पण, सध्या जे घडतंय ते पाहता लोकशाहीचे पावित्र्य नष्ट करण्याचा ठेका प्रत्येकाने घेतला आहे असं वाटते. एक आमदार ५ गुंड घेऊन येतो मारामारी करतो. मारहाण करणारे पाच जण असतात. गुन्हा एकावरच दाखल केला जातो. मार खाणाराच गुन्हेगार ठरविला जातो. आता तर पिकांची हमी मागणार्यांना रमी दाखविली जाते. ज्या रमी जुगाराने तरुणांनी आत्महत्या केल्या. तोच जुगार सभागृहात खेळला जात आहे. या महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या डावावर लावलेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली. एक्स हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांचा आव्हाडांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, असा खणखणीत टोला त्यांनी लगावला कोकाटेंना लगावला.
आव्हाड पुढे असंही म्हणाले की, विधिमंडळाचे पावित्र्य न राखण्याचा विडाच सत्ताधार्यांनी आखला आहे. सत्ताधारी पक्षातील एक आमदार शरद पवार , उद्धव ठाकरे , जयंत पाटील यांच्यावर अत्यन्त खालच्या पातळीवर टीका करतो. बाळासाहेब ठाकरे याना सूर्याजी पिसाळ म्हणतो. तरीही त्यांचे वरिष्ठ त्याला रोखत नाहीत. त्यामुळेच हा आमदार गुंड घेऊन विधिमंडळात मारामारी करायला येऊ शकतो. त्यावेळी जर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडले असते. त्यावेळी मकोका, दरोड्यातील पाच गुंड होते. त्यांची नावेही दिली आहेत. मात्र गुन्हा फक्त एकावरच दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी… pic.twitter.com/GSzJHqYqP7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 20, 2025
माझे विधानसभाध्यक्षांना आवाहन आहे की, मार खाणाऱ्याला अटक केली तशीच अटक मारणाऱ्या इतर चार गुंडाना आणि त्या गुंडाना इशारा करणाऱ्यावर कारवाई का नाही करीत ? म्हणूनच मी सभागृहात खेद व्यक्त केला नाही. मला वाईट वाटले हे मी सांगितले; माझी चूक असेल तर मी गेट वे ऑफ इंडिया समोर राज्याची माफी मागायला तयार आहे. मात्र, न केलेल्या चुकीची माफी मागणार नाही. नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे. त्यासाठी मी आणि रोहित पवार रस्त्यावर भूमिका घेऊन उतरलो. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला तीन तास इथून -तिथे नाचवले, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्या जुगाराच्या प्रकरणावर राजीनामा घ्यायला हवा होता. पण, तो घेतला जात नाही. ज्या ऑनलाईन रमीमुळे तरुणांनी आत्महत्या केली. त्या रमीचा डाव मांडला जात आहे. असा डाव मांडणारे धन्य आहेत, असेही आव्हाड म्हणाले.