आता वाहनचालकांची होणार ‘ड्रग्ज’ सेवन तपासणी
महाराष्ट्रासह इतर राज्यात शहरात मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन करून वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ड्रंक अँण्ड ड्राईव्हच्या केसेस वाढत आहेत. अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी ड्रायव्हरची अल्कोहोल चाचणी करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांना आळा घालण्यासह बेशिस्त चालकांवर कडक कारवाई करण्यासाठी सरसकट सर्व वाहन चालकांची आता ड्रग्ज तपासणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यासाठी नवीन उपकरणे परिवहन विभाग खरेदी करणार आहे.
रस्ते अपघातामध्ये घट होण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजना या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना परिवहन विभागातर्फे लवकरच चालकांचे ड्रग्ज टेस्टिंग सुरू करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. अशा प्रकारे चालकांची ड्रग्ज टेस्टिंग करण्याचा देशात हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
देशात रस्ते अपघातात महाराष्ट्रात तिसरा क्रमांक लागतो. रस्ते अपघात आणि मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागासह विविध उपाययोजना राबविण्यात येतात. तरीही रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत चालकांची संख्या देखील वाढत आहे. परंतु अनेक चालक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतात. वेगाने वाहन चालविण्यासह, मद्यपान आणि ड्रग्ज, अमली पदार्थांचे सेवन करून बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या घटनांची संख्या वाढत आहे. अशा घटनांमध्ये तात्काळ चालकाची ड्रग्ज टेस्ट करण्याची कोणतीही सुविधा सध्या परिवहन विभागाकडे उपलब्ध नाही.
वाढते अपघात चिंतेची बाब असून, वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळेच वाहनचालकांचा, प्रवाशांचा आणि इतरांचा हकनाक बळी जात आहे. ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात, राज्यात रस्ता अपघातांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्युमध्ये नाशिक आघाडीवर आहे. एसटी महामंडळ, रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस, दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारची वाहने चालविणाऱ्या सर्व चालकांची इग्ज चाचणी होणार आहे.