शिरूर तालुक्यातील शिंदोडीतून साडेसहा लाखांच्या मातीची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल होताच... (File Photo : Sand Smuggler)
तासगाव : विनापरवाना वाळू वाहतूक करत असताना तासगाव पोलिसांनी पिकअप गाडी पकडली. तासगाव ते मणेराजुरी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सहाय्यक फौजदार सुनील होळकर यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. पिकअप व वाळूसह एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र दशरथ डिसले (वय २७, रा. वरचे गल्ली, तासगाव) या संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सुनील होळकर हे जुना सातारा बायपास रस्त्यावर शनिवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी नंबरप्लेट नसलेली पिकअप येरळा नदीपात्राकडून येऊन बायपास रस्त्याने मणेराजुरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. होळकर यांनी चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता, त्याने वेगाने मणेराजुरीच्या दिशेने पिकअप गाडी पळवली. होळकर यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला.
दरम्यान, वासुंबे हद्दीत सरस्वतीनगरमध्ये त्यांनी पिकअप गाडी रोखली. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता पिकअपमध्ये अर्धा ब्रास वाळू आढळून आली. याबाबत डिसले याच्याकडे चौकशी केली असता, त्याने येरळा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन करून आणली असल्याचे सांगितले. पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचा पिकअप आणि पाच हजार रुपयांची वाळू जप्त केली. याप्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलिस करत आहेत.
नदी-नाल्यातून वाळूची उपसा
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यात नदी नाल्यांमधून वाळूची उपसा केली जात होती. बोटींमधून रात्रीच्यावेळी वाळूचा बेकायदा उपसा तसेच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ड्रोन’द्वारे आता नदी नाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाळू माफियांच्या वाळू चोरीला चाप बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड तसेच आंबेगाव, जुन्नर भागात या ड्रोनचा वापर केला जात आहे.