राज्यभरात गॅस सिलेंडरवर धाडसत्र सुरुच; नाशिकमध्ये 447 टाक्या जप्त तर जालन्यात... (फोटो सौजन्य-X)
मुंबई : एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असून, अन्न व नागरी पुरवठा विभागासह पोलिसांनी आता छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असून, नाशिकमधून तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या छाप्यात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान १५८ भरलेले आणि २८९ रिकामे असे एकूण ४४७ सिलिंडर जप्त करण्यात आले. याशिवाय दोन छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रकही ताब्यात घेण्यात आला. दुसरीकडे, जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल ११० गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची घटना घडली. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून ९६ घरगुती गॅस सिलिंडरसह १२ व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलिंडर चोरीला गेले.
दरम्यान, अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अवैध सिलिंडर वापरावर कारवाई केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचे प्रकरण समोर आले होते. मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी दर्यापुरात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकणमध्ये ट्रकमधून विक्री; कॅमेऱ्यात कैद
चाकण औद्योगिक क्षेत्रात गॅस टंचाईमुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि कामगारांचे जीवन आधीच कोलमडलेले असतानाच चाकणच्या गॅस कंपनीच्या गेटवर रांगेत उभ्या गॅस ट्रकमधूनच सिलिंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचे उघड झाले. कंपनीच्या गेटसमोर रांगेत उभ्या असलेल्या गॅस ट्रकमधूनच सिलिंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचे उघड झाले आहे.
हॉटेल्स, वितरकांवर ‘वॉच’
गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या जागतिक संकटामुळे घरगुती गॅस वितरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, व्यावसायिक वापरावर मर्यादा आल्याने काळाबाजाराची शक्यता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने गॅस टंचाई आणि रेशनिंग रोखण्यासाठी कंबर कसली असून, जिल्ह्यातील १३५ गॅस वितरकांची तपासणी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १२ ठिकाणी अचानक पाहणी करण्यात आली. व्यावसायिक वापरावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. तसेच, हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत नाही ना, याचीही तपासणी करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
वसईत तिघांना अटक
वसईत घरगुती गॅस सिलिंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्या हॉटेलवर धडक कारवाई करण्यात आली आहे. वसई पूर्वेतील नवजीवन परिसरातील लजिज हॉटेलवर पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात (बीएनएस) तसेच पेट्रोलियम कायद्यान्वये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : गॅस सिलिंडरच्या टंचाईने नांदेडकर त्रस्त; अधिवेशनात लोकप्रतिनिधींचे मार्ग काढण्याचा प्रयत्न






