नांदेडमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे (फोटो - सोशल मीडिया)
LPG Gas Shortage : अमृत देशमुख : नांदेड : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इजाईल संघर्षामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशभरात विशेषतः महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात गॅस सिलिंडरची (LPG Gas) टंचाई व दरवाढीची समस्या निर्माण झाली आहे. नांदेड जिल्हाही गॅस टंचाईने होरपळून निघाला आहे, जिल्ह्याला गॅस टंचाईचा फटका बसत असतानाच दिल्ली व मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार, आमदार विकासकामांसाठी पाठपुरावा करत होते. या दोन्ही विभिन्न घडामोडींमुळे मागील आठवडा चर्चेत राहिला. (Nanded News)
मध्यपूर्व देशांतून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर जाणवू लागला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याचे चित्र दिसून आले. संभाव्य तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त गॅस बुकिंग करण्यास सुरुवात केल्यामळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला. परिणामी अनेक गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाल्या. दरम्यान, काही ठिकाणी जादा दराने गॅस सिलिंडरची विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले, कोणीही जादा दर आकारत असल्यास तत्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असे स्पष्ट करण्यात आले.
हे देखील वाचा : राजकीय नेत्यांच्या प्रशिक्षणाला ‘ब्रेक’, नगरसेवकांची दांडी; रिकाम्या खुर्त्यांचीच चर्चा
चर्चेने आठवडा गाजला
गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र दिल्ली व मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त होते. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवला. ऐन उन्हाळ्यात गैस टंचाईच्या झळा बसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. दरम्यान, अधिवेशनाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. राज्यसभेतही त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करत जिल्ह्याच्या विकासासाठी पाठपुरावा केला. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी जिल्हह्यातील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, श्रीजया चव्हाण, आनंदराव बौढारकर, राजेश पवार आणि भीमराव केराम मुंबईत उपस्थित राहून आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात मांडले.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात जे चाललयं ते पटत नाहीये? राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्याचा टीझर आऊट
संबंधित मंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासने मिळाल्याने जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्याच बरोबरच खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी पोलिस आयुक्तालय नांदेडला स्थापन हावे, अशी मागणी करत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली त्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. गॅस सिलिंडरची टंचाई, दरवाढीची विता आणि विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा या विविध सामाजिक-राजकीय घडामोडीमुळे मागील आठवडा नांदेड जिल्ह्यात विशेष चर्चेत राहिला.






