
पुणे : पाषाण- सुस रस्त्यावर भरधाव शिवशाही बसचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. बसने समोरच्या वाहनाला उडविल्यानंतर ही वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. पण, चार ते पाचजण जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास बोरिवली ते सातारा शिवशाही बस पाषाण- सुस रोडने जात होती. येथील महामार्गावर बस आल्यानंतर तिचा ब्रेक फेल झाला. अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने समोरच्या एका वाहनाला उडविले. त्यानंतर या बसने इतर वाहनांना धडक दिली.
सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात ५ जण जखमी झाले असून, त्यांना नाजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.