
Storm arrives in Kolhapur on return journey of rain orange alert for Kolhapur monsoon news update
Maharashtra Monsoon Alert: कोल्हापूर : राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन आठवड्यापूर्वी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची ही जखम भरण्यापूर्वीच पुन्हा एकदा वरुणराजाचे आगमन झाले आहे. राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर कोल्हापूरमध्येही तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये सलग सहा तास पाऊस झाल्यामुळे सामान्य लोकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे.
गेले दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून ऑक्टोबर महिनाअखेरीस परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. सतत पडणाऱ्या या पावसामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. मान्सूनचा परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसापासून सुरुवात केली आहे. एक दोन दिवसांनी अधून मधून काही अंशी पाऊस पडत होता. मात्र सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आकाशात काळे कुठ ढग अचानक जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग सहा तास पावसाने चांगलेच झोडपून काढले त्यामुळे व्यापारी वर्गाची तसेच नागरिकांची चांगलीच तारांबळा उडाली .
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संपूर्ण जिल्ह्यात पावसाने झोडपून काढल्याने काढणीसाठी आलेले भात, भुईमूग, ज्वारी ,नाचणी, उडीद आदी पिकावर पावसाचे सावट पडले आहे. तर हंगामी ऊस लागणीची कामे खोळंबून पडली आहेत. यंदाचा ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याने ऊस तोडणी मजूर परिसरात दाखल झाले आहेत. मात्र या पावसामुळे ऊस तोडणीवरही परिणाम झाला आहे. आणखीन दोन दिवस हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असल्याने पाऊस वाढण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने नदीची पाणीपातळी सुद्धा वाढली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यावर पावसाचे भीषण संकट
राज्यात वादळी वारे, विजा आणि अवेळी पावसामुळे जीवनमान प्रभावित होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावरील हे कमी दाबाचे क्षेत्र मागील काही तासांत नैऋत्येकडे सरकले असून सध्या ते मुंबईपासून सुमारे ७६० किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.
येणाऱ्या काळात कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. मराठवाडा भागात २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मच्छीमारांसाठी चेतावणी
समुद्राला उधाण असल्याने पूर्व मध्य आणि आग्नेय अरबी समुद्र तसेच लक्षद्वीप, कोमोरिन क्षेत्र, कर्नाटक व केरळ किनारपट्टीवर २७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात उधाण ते तीव्र उधाण अशी स्थिती राहण्याचा अंदाज आहे. ईशान्य अरबी समुद्र, महाराष्ट्र-गोवा व गुजरात किनारपट्टीवर २६-२७ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. म्हणून मच्छीमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.