Bihar Election 2025: लालू यादव यांनी कशी केली राष्ट्रीय जनता दलाची स्थापना; कसा आहे RJDचा इतिहास
Rashtriya Janata Dal:बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ५ जुलै १९९७ रोजी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. १९९० ते २००५ पर्यंत या काळात राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) बिहारवर राज्य केले. या काळाला “लालू-राबडी युग” असेही म्हटले जाते. पक्षाची मुख्य विचारसरणी “सामाजिक न्याय” असून मुस्लिम आणि यादव समुदाय हा आरजेडीची पारंपारिक मतपेढी राहिली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी पक्ष देशातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक आहे. आरजेडीच्या नेतृत्त्वात बिहारमध्ये तीन वेळा सरकार स्थापन करण्यात आले. २००८ मध्ये आरजेडीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली. पण अवघ्या दोन वर्षातच आरजेडीने २०१० मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला.
२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, आरजेडी नितीश कुमार यांच्या पक्ष, जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि काँग्रेससोबत “महाआघाडी” स्थापन करून सत्तेत परतला. या निवडणुकीत, ८० जागा जिंकून राजद सर्वात मोठा पक्ष बनला. २०१७ मध्ये जेडीयू एनडीएमध्ये परतल्यानंतर हे सरकार कोसळले.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत, तेजस्वी यादव यांनी लालू यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे नेतृत्व केले. राजद ७५ जागा जिंकून पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला, परंतु ‘महाआघाडी’ बहुमतापासून कमी पडली. सध्या, राजद बिहारमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करते आणि ‘महाआघाडी’चे नेतृत्व करते.
१९९७ मध्ये चारा घोटाळ्यात सहभागी झाल्यानंतर, जनता दलाच्या आतून आणि बाहेरून लालू प्रसाद यादव यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला होता. या राजकीय संकटाच्या काळात, ५ जुलै १९९७ रोजी, पप्पू यादव, रघुवंश प्रसाद सिंह, मोहम्मद शहाबुद्दीन, अब्दुल बारी सिद्दीकी, कांती सिंग, मोहम्मद तस्लीमुद्दीन आणि मोहम्मद अली अश्रफ फातमी यांच्यासह १७ लोकसभा आणि ८ राज्यसभेचे खासदार नवी दिल्लीत एकत्र आले आणि त्यांनी जनता दलापासून वेगळे होऊन राष्ट्रीय जनता दल या नवीन पक्षाची स्थापना केली. लालू प्रसाद यादव हे आरजेडीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले. हा पक्ष मध्य-डाव्या विचारसरणीवर आधारित आहे.
२५ जुलै १९९७ रोजी, वाढत्या दबावाखाली, लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले, ज्यामुळे पक्षात नेतृत्व टिकून राहिले आणि सत्तेवरची पकड कायम राहिली.
मार्च १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, आरजेडीने चांगली कामगिरी केली, बिहारमध्ये १७ लोकसभा जागा जिंकल्या, परंतु इतर राज्यांमध्ये त्यांचा प्रभाव मर्यादित होता. त्याच वर्षी, पक्षाने भारतीय जनता पक्षाविरुद्ध समाजवादी पक्षासोबत धर्मनिरपेक्ष युती केली, जी अपेक्षित पाठिंबा मिळवू शकली नाही. १९९९ च्या निवडणुकीत पक्षाला फक्त ७ जागा मिळाल्या.
१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने (राजद) काँग्रेसशी युती करून निवडणुका लढवल्या, परंतु या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्यासह पक्षाला फटका बसला आणि १० जागांचा तोटा सहन करावा लागला. तथापि, २००० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राजदने चांगली कामगिरी केली. काँग्रेससोबत निवडणूकोत्तर युती करून त्यांनी बहुमत मिळवले आणि सत्ता स्थापन केली.
२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही राजदने काँग्रेससोबत युती कायम ठेवली आणि २४ लोकसभा जागा जिंकल्या. यूपीए सरकारचा भाग बनलेल्या राजदला केंद्रात महत्त्वाचे स्थान मिळाले आणि लालू प्रसाद यादव यांची रेल्वेमंत्रीपदी नियुक्ती झाली.
फेब्रुवारी २००५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राजदला सत्तेवरून गमवावे लागले. पक्ष केवळ ७५ जागांवरच विजयी झाला. त्याच वर्षी झालेल्या पुनर्निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि राजदची ताकद आणखी घटून ५४ जागांवर आली.
Bihar Election 2025: ‘जब लालू जी नहीं डरे तो बेटवा डरेगा…’; तेजस्वी यादवांचा थेट मोदी-शाहांवर घणाघात
२००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद निर्माण झाल्याने राजदने यूपीएपासून विभक्त होत लोक जनशक्ती पक्ष आणि समाजवादी पक्षासोबत “चौथा मोर्चा” स्थापन केला. मात्र या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही आणि राजदला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजद पुन्हा यूपीएमध्ये सामील झाला आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बिहारमधील ४० जागांवर लढला. राजदने २७ जागांवर उमेदवार उभे केले, परंतु केवळ चार जागांवरच विजय मिळवता आला.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजदने २३ जागांवर लढवलेले उमेदवारांपैकी फक्त चार जिंकले. त्याचप्रमाणे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही परिस्थितीत काही बदल झाला नाही — एकूण २३ जागांवर लढून राजदला पुन्हा केवळ चारच जागांवर यश मिळाले.






