मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात, असे विधान जुन्नरचे अजित पवार यांच्या गटाचे आमदार अतूल बेनके यांनी केले होते. त्याआधी त्यांनी जुन्नरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांची भेटही घेतली होती. त्यामुळे अतूल बेनके शरद पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या.
अतूल बेनके यांच्या या भूमिकेला 24 तास उलटत नाहीत तोच अजित पवारांच्या आणखी एका आमदाराने शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांचा पुनरुच्चार केला आहे. पिंपरी चिंचवडचे अजित पवार यांच्या गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गोटात पुन्हा बंडखोरीचे वादळ घोंगावत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अण्णा बनसोडे यांनी अतूल बेनके यांच्या दाव्यावर भाष्य करत त्यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. काल अतूल बेनके जे म्हणाले राजकारणाची शाश्वती नाही. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. ते सत्यच आहे. अजितदादा आणि शरद पवार साहेब आमच्यासाठी एकच आहेत. ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. असे बनसोडे यांनी म्हटले आहे. यासाठी काही हालचाली सुरू आहेत का, असा सवाल विचारला असता बनसोडे म्हणाले, ते दोघे मोठे नेते आहेत. चर्चा करणे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मी यासंदर्भात दादांशी बोलू शकतो. पण साहेबांशी दादाच बोलू शकतात. असेही बनसोडे यांनी म्हटले होते.
दरम्यान, काल अतूल बेनके यांनीदेखील अजित पवार आणि शरद पवार विधानसभा निवडणुकीआधी एकत्र येण्यावर भाष्य करत खळबळ उडवून दिली होती. “विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही होऊ शकते. त्यावर आताच भाष्य करण्यत काहीही अर्थ नाही. आता आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काही झालं तर आम्ही आम्ही, कदचित दादा आणि शरद पवार साहेब पुन्हा एकत्र येऊ शकतात. राज्यातील 288 आमदारांपैकी जुन्नर तालुक्यातील मी एक छोटासा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे काय घडेल, हे मी आताच सांगू शकत नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.