
एसटीच्या ऑनलाईन तिकिटांना मिळतोय प्रतिसाद; डिसेंबर महिन्यात पडली मोठी भर
मुंबई : एसटी महामंडळाचे ऑनलाईन आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. सप्टेंबर २०२५ च्या तुलनेत डिसेंबरमध्ये रोजच्या सरासरी तिकीट विक्रीत ४ हजार ६६१ तिकिटांची भर पडली आहे. एसटीच्या मोबाईल अॅपमधून आरक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांचा टक्का देखील वाढत आहे.
एसटीतून रस्ते प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवासी आरक्षण करून प्रवास करतात. आरक्षणासाठी स्थानक-आगारातील आरक्षण केंद्रात ऑफलाईन आणि अधिकृत एजंट, संकेतस्थळ-मोबाईल ऍपच्या माध्यमाने ऑनलाईन आरक्षणाची मुभा आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये पाच लाख ८० हजार ३८३ प्रवाशांनी आरक्षण करून प्रवास केला. डिसेंबरमध्ये आरक्षित प्रवाशांची संख्या आठ लाख ५३ हजार ४३ वर पोहोचली.
महामंडळाच्या अधिकृत ‘एमएसआरटीसी’ मोबाईल रिझर्वेशन अॅपच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये तीन लाख ४५ हजार ३२६ प्रवाशांनी तर डिसेंबरमध्ये पाच लाख एक हजार ९६६ प्रवाशांनी मोबाईल अॅपमधून तिकीट आरक्षित करून प्रवास पूर्ण केला. सप्टेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एक लाख ५६ हजार ६४० प्रवाशांनी आरक्षित प्रवासासाठी एसटी अॅपला पसंती दिली आहे.
दररोज 54 लाख प्रवासी
एसटीतून दररोज सुमारे ५४ लाख प्रवासी प्रवास करतात. एसटीतून आरक्षित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा टक्का तुलनेने कमी आहे. प्रवाशांनी ऑनलाईन आरक्षण करून प्रवास वाढवण्यासाठी एसटीच्या संकेतस्थळासह एसटीच्या अॅपमध्ये प्रवासी सूचनेनुसार बदल करण्यात आले. ऑनलाईन आरक्षणाच्या प्रवासासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपवरून तिकीट घेणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ दिसून येत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यामुळे स्वतः परिवहन विभागानेच याबाबत कंबर कसली आहे. बसस्थानकांच्या संपूर्ण आवारात, तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक, तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : Gadchiroli News: एसटी बसस्थानकांचा होणार कायापालट! परिवहन विभागाने हाती घेतली नवीन मोहीम