विटा, सांगली: बेणापूर (ता. खानापूर) येथील विवेक कृष्णराव शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत ९३वा क्रमांक पटकावून भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) पद मिळवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानंतर खानापूर तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विवेक शिंदे हे शिवसेनेचे नेते राजाभाऊ शिंदे यांचे पुतणे आहेत. शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०२३ मध्ये विवेक यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली होती, परंतु अवघ्या दोन गुणांनी अंतिम यादीतून त्यांचे नाव वगळले गेले. मात्र जिद्द न सोडता त्यांनी २०२४ साली पुन्हा प्रयत्न केला आणि अखेर ९३वा क्रमांक पटकावून आयपीएस पदाला गवसणी घातली. सध्या विवेक शिंदे यांचे कुटुंब व्यवसायानिमित्त रोहतक (हरियाणा) येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या यशाची वार्ता मिळताच बेणापूर येथे राजाभाऊ शिंदे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
असा आहे विवेक शिंदेंचा प्रवास?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, यशाबाबत बोलताना विवेक आपल्या भावना व्यक्त केल्या. “जे काही करताय, ते पूर्ण समर्पणाने करा. यूपीएससी हा यशाचा एकमेव मार्ग नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात १००% दिलं तर देशाच्या विकासात मोलाचं योगदान देता,” असा संदेश आयपीएस अधिकारी झालेल्या विवेक शिंदे यांनी दिला.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील दुष्काळी घाटमाथ्यावर वसलेल्या बेणापूर गावचा सुपुत्र विवेक शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत ९३वा क्रमांक पटकावून भारतीय पोलीस सेवा (IPS) पद मिळवलं आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे.
विवेक यांना सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली होती. ते म्हणाले, “माझे वडील आणि चुलते या क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. आमच्या भागात दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक अडचणी होत्या. त्यावेळी कलेक्टरांनी पाणी प्रकल्पांसाठी केलेल्या कामगिरीने मला अधिकच प्रेरित केलं. आमच्या हरियाणा येथील व्यवसायाच्या ठिकाणी श्रीकांत जाधव सरांसारख्या आयपीएस अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यांच्या प्रेरणादायी संवादाने मी दहावीत असतानाच ठरवलं की भविष्यात यूपीएससी द्यायची आणि आयपीएस अधिकारी व्हायचं.”
विवेक शिंदे यांनी आयआयटी गुवाहाटी येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. “ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी यूपीएससीची तयारी सुरू केली. मी कॅम्पस प्लेसमेंटलाही बसलो नाही. २०२३ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली, पण अवघ्या दोन गुणांनी अंतिम यादीतून बाहेर पडलो. मात्र जिद्द सोडली नाही. २०२४ मध्ये दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि यश मिळवलं.”
विवेक यांच्या यशामध्ये त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. ते सांगतात, “माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी शिक्षणावर नेहमी भर दिला. घरातील सर्वांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. कुटुंबाने नेहमीच प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच मी हे स्वप्न पूर्ण करू शकलो. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि या प्रवासातून मी एवढंच शिकलो की, तुमचं ध्येय ठरवा आणि त्यासाठी संपूर्ण समर्पणाने मेहनत घ्या!”