आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक
मिरज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य इद्रिस नायकवडी यांच्या वाहनावर मिरज पूर्व भागात दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. जानराववाडी गावाजवळ दोघा अज्ञातांनी आमदार नायकवडी यांच्या गाडीवर पाठीमागून दगड मारला. या दगडफेकीत आमदार नायकवडी यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, यावेळी आमदार नायकवडी हे या वाहनांमध्ये नव्हते ते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या वाहनामध्ये बसले होते. पण, आमदारांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
याबाबत कार्यकर्त्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मिरज पूर्व ग्रामीण भागामध्ये जनसंवाद दौरा व आमदार आपल्या दारी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मिरज पूर्व भागातील चाबूकस्वारवाडी, जानराववाडी, कदमवाडी, बेळंकी आदी भागात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे व विद्यमान आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जानराववाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर माजी मंत्री घोरपडे व आमदार नायकवडी हे एका वाहनातून कदमवाडीच्या दिशेने जात होते.
हेदेखील वाचा : Ambadas Danve News: ‘राज्य सरकारच्या तीन जादुगारांची हातचालाखी…’; शेतकऱ्यांच्या मदतीच्या पॅकेजचा पर्दाफाश
यावेळी आमदार नायकवडी हे माजी मंत्री घोरपडे यांच्या वाहनात बसले होते. तर आमदार नायकवडी यांच्या वाहनात (एमएच १० ईजे ९६००) मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष देवजी साळुंखे व आमदार नायकवडी यांचे अंगरक्षक तसेच अन्य कार्यकर्ते बसले होते. पाठीमागील बाजूस असलेल्या आमदार नायकवडी यांच्या या वाहनावर पाठीमागून अज्ञातांनी दगडफेक केली. यावेळी एक दगड नायकवडी आमदार नायकवडी यांच्या वाहनाच्या पाठीमागील लाईटवर लागला. यामुळे वाहनाच्या लाईटची काच फुटली.
यामध्ये वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असले तरी आमदारांच्या वाहनावर झालेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी माजी नगरसेवक अतहर नायकवडी, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, सुलेमान मुजावर, कबीर मुजावर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते.
लिमये मळ्यानजीक वाहनावर हल्ला
जानराववाडी येथून बेळंकीच्या दिशेने जात असताना लिमये मळ्यामजीक वाहनावर हल्ला झाला. पाठीमागून आलेल्या दोघांनी वाहनावर दगड मारला आणि ते दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोरांनी तोंडाला कापड बांधले होते.