Sunanda Pawar visits Krushik 2025 International Agricultural Exhibition in Baramati
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली असून पुन्हा एकदा राज्याचे कामकाज जोमाने सुरु झाले आहे. सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्ष देखील कामाला लागले आहेत. महायुतीचे नेते पुढील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर विरोधकांनी जनमानसामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. आता आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी कृषी प्रदर्शनाला देखील भेट दिली आहे.
बारामतीमध्ये कृषी प्रदर्षण भरवण्यात आले आहे. या ठिकाणी सुनंदा पवार यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या की, “या कृषी प्रदर्शनाचे हे दहावे वर्ष आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम करत असताना या संस्थेला 55 वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस आणि इतर अनेक पिके घेण्यात आली आहेत. जगातील 48 देशांनी आमच्या या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपक्रमाची दखल घेतली आहे,” असे मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी भरड धान्यावर भर देणार असल्याचे देखील सांगितले आहे. सुनंदा पवार म्हणाल्या की, “वेगवेगळी भरड धान्याचे प्रात्यक्षिक देखील शेतकऱ्यांना पहायला मिळणार आहे. भरड धान्य हे मधुमेह कंट्रोल करतात, कॅन्सर नियंत्रित राहतो या भरड धान्य पिकाचे प्रात्यक्षिक आणि स्टॉल शेतकऱ्यांसाठी इथे ठेवण्यात आली आहेत. मधमाशी प्रयोग देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे, जवळपास 600 पेट्या शेतकरी स्वतःच्या डाळिंब बागेमध्ये भाडेतत्त्वावर घेऊन जातात,” अशी माहिती सुनंदा पवार यांनी दिली आहे.
प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण AI
पुढे सुनंदा पवार यांनी बारामतीमधील कृषी प्रदर्शनामधील लक्षवेधी ठरत असलेल्या AI बद्दल देखील बोलल्या आहेत. त्या म्हणाल्या की, “या प्रदर्शनामध्ये पशुंचे देखील प्रदर्शन पहाण्यासाठी ठेवले आहे. आधुनिक पद्धतीचे ट्रॅक्टर आणि त्याला लागणारी अवजारे देखील या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण AI टेक्नॉलॉजी, यामध्ये आपण ऊसावर प्रयोग करत आहोत येत्या काही काळामध्ये आपण सर्व फळबागांवर देखील AI च्या माध्यमातून प्रयोग करणार आहोत,” असे सुनंदा पवार म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शेतकऱ्यांना शेतजमीन न विकण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. सुनंदा पवार म्हणाल्या की, “अन्नाची गरज सगळ्यांनाच लागणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन विकू नये परंतु शेती करत असताना ते नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा. कमी खर्चातील शेती कमी पाण्यातील शेती करणे आता काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे, शेती पिकवायची पद्धत बदलली पाहिजे शेतीकडे जातीनं लक्ष घाला. कट्ट्यावरच्या गोष्टी आणि राजकारण त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे, शेतीकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे याचा अनुभव मी घेतला आहे. शेतीकडे लक्ष दिलं तर ती लाखामध्ये कोटीमध्ये उत्पन्न देते, माझ्याकडे फक्त 32 एकर शेती आहे यामध्ये मी केसर आंब्याची लागवड केली आहे. या आंब्याचे मार्केटिंग मी स्वतः करते तेव्हा मला कळते की माझी बाग मला किती देते, शेतकऱ्याला पिकवायचे जमते पण विकायचे जमत नाही ते पण शिकले पाहिजे आणि मी शेतकरी आहे शेती करतो याची लाज नाही वाटली पाहिजे,” असे स्पष्ट मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.