पुणे: “वडगावशेरीवाल्यांनी तर काही बोलूच नये, कुठल्या तोंडाने मते मागणार आहेत. त्यांच्या दोन्ही हातावर खून आहे, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर . दोन मुलांचा जीव गेलाय, कधी विचार केलाय का, त्यांच्या आई-वडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल. पण तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्शे गाडी आहे म्हणून. ती गाडी, पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार. पण मी स्वत: सुनील टिंगरे यांच्या विरोधात प्रचार करणार आहे.”अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. तसेच, जंग जंग पछाडीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
तीन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेने राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची झोप उडवली होती. त्यानंतर या प्रकरणात आमदार सुनील टिंगरें यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात, संबंधित अल्पवयीन मुलगा, त्याच्या मित्रांसह ससून रुग्णालयाचे डॉक्टर्सलाही अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकारणही चांगलंच तापलं होतं. हाच मुद्दा पकडून आता सुप्रिया सुळे सुनील टिंगरेंविरोधात उभा ठाकल्या आहेत. पुण्यात झालेल्या सभेत त्यांनी सुनील टिंगरेंवर गंभीर आरोप करत, त्यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा: विधानसभेआधी बच्चू कडूंना मोठा फटका; आमदार धनुष्णबाण हाती घेण्याच्या तयारीमध्ये
“मध्यप्रदेशात त्या मुलांचे आईवडील राहतात, त्यांचे अश्रू पुसायला तुम्ही जाणार आहात का. पण पिझ्झा,बिर्याणी घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जाता. हे पोलीस स्टेशन आहे. तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाही, ही मस्ती तुमच्या घरी दाखवाची, सर्वसामान्य माणसाच्या अश्रूंसमोर हे नाही चालणार. ही पोर्शे गाडी कितीतरी कोटींची आहे. कुठल्या पैशाने विकत घेतलीये देवालाच ठाऊक, असाही आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
तसेच, त्या पोर्शे कारने ज्या तरुणांचा खून झाला, त्यांची काय चूक होती. ते गरीब होते म्हणून, ते मोटरसायकलवर होते ही त्यांची चूक होती का. गरीब माणसाच्या आयुष्याची तुम्ही ही किंमत करणार आणि पोर्शे कारवाल्याला बिर्याणी खायला घालाल. हे नाही चालणार नाही, अशा प्रवृत्तींना घरी पाठवण्याची जबाबदारी आता वडगावशेरीकरांवर आहे.’ असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: हैतीमध्ये मोठा नरसंहार! गॅंग हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी हजारो लोक घर सोडून पळाले
“कुठल्या तोंडाने मते मागणार माझा आरोप आहे तुम्ही भ्रष्टाचारी आहात, खूनी आहात. त्या आईचे दु:ख, वेदना कधीतरी बघाव्यात काय असतात. पण ते एवढ्यावरच थांबले नाही. रक्त तपासणी केली आणि रक्ततपासणीत रक्त बदलण्याचे पापही त्यांनी केले आहे. असा लोकप्रतिनिधी तुम्हाला पाहिजे, असे सरकार पाहिजे. त्यासाठी कुणी फोन केले. महाराष्ट्र प्रश्न विचारत आहे. महाराष्ट्र हक्क मागत आहे. मी हक्क मागत आहे. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये फोन कुणी केला. रक्त तपासणीवेळी ससून हॉस्पीटलमध्ये फोन कुणी केला, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंन विचारले आहेत.
“मी हक्क मागतेय त्या आईसाठी, त्या आईसाठी मी लढाई मागत आहे. कर्ता मुलगा आणि कर्ती मुलगी गेली. पण यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली. वेगाने गाडी चालवली नसती तर आज त्यांचं घर हसते खेळतं राहिलं असतं. गुन्हेगार आहेत हे लोक आणि आम्ही काहीच केलं नाही, असे म्हणत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.