
कराड उत्तरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊस वाहतूकच रोखली, 3 किलोमीटरपर्यंत रांगा
शहापूर फाटा ते मसूर, इंदोली फाटा ते इंदोली या मार्गांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉलींच्या सुमारे ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. परिणामी, या मार्गावरील इतर वाहतुकीवरही आंदोलनाचा परिणाम झाला. गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वाठार येथे ऊस वाहतूक रोखून आंदोलन केले होते. पुढील कडी म्हणून शुक्रवारी कराड उत्तर भागात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी ऊस वाहतूक रोखत आंदोलन तीव्र केले.
दरम्यान, सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळावा. पहिली उचल किमान साडेचार हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अंतिम ऊसदर साडेपाच हजार रुपयांपर्यंत मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
1. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी काय आहे?
ऊसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये आणि अंतिम दर प्रतिटन ५,५०० रुपये मिळावा, अशी मागणी आहे.
2. आंदोलन कुठे करण्यात आले?
कराड उत्तर विभागातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
3. आंदोलनाचा ऊस वाहतुकीवर काय परिणाम झाला?
आंदोलनामुळे ऊस वाहतुकीची यंत्रणा विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या.