
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताराचा मुक्त संचार
अचाट साहसामुळे तारा ठरली चर्चेचा विषय
तिच्या हालचालीवर वनविभागाचे बारीक लक्ष
कोल्हापूर: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली ‘तारा’ ही वाघीण आपल्या अचाट साहसामुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वाघीण कुणाला घाबरत नसते; तिची डरकाळी आणि जबडा पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र, यावेळी ताऱ्याने केवळ आपल्या ताकदीचेच नव्हे, तर बुद्धिमत्ता, धैर्य आणि जिवंत राहण्याच्या वृत्तीचेही दर्शन घडवले. तिच्या या साहसाने वनविभागाचे अधिकारी, तज्ज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक थक्क झाले असून व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात तिच्या नावाची ऐतिहासिक नोंद झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे संचार करण्यासाठी ताऱ्याला जंगलात सोडण्यात आले होते. प्रारंभी तिच्या हालचालींवर वनविभागाचे पथक बारकाईने लक्ष ठेवून होते. दरम्यान, वारणा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तिचा प्रवेश झाला. हा परिसर मगरींच्या वावरासाठी ओळखला जातो. मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा, खोल पाणी आणि मगरींचा धोका पाहता हा भाग कोणत्याही वन्यप्राण्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो.
पाटणकडे जाणाऱ्या ST बसची ‘तारा’ने अडवली वाट; ढेबेवाडीत नागरिकांचा जीव टांगणीला
अशा परिस्थितीत ताऱ्याने घेतलेला निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला. वारणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तिने तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता पोहत पार केले. विशेष म्हणजे, हे अंतर पार करताना पाण्यात मगरींचा वावर असतानाही तिने कुठलाही गोंधळ न उडवता, शांतपणे आणि ताकदीने प्रवास पूर्ण केला. पाण्याच्या प्रवाहाला तोंड देत, योग्य दिशेने पोहत तिने आपली सुटका करून घेतली.
या संपूर्ण घटनेदरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली होती. जीपीएस कॉलरच्या माध्यमातून तिच्या हालचालींचे निरीक्षण सुरू होते. काही काळ सिग्नल मंदावल्याने चिंता वाढली, मात्र थोड्याच वेळात तारा सुरक्षितपणे दुसऱ्या काठावर पोहोचल्याची माहिती मिळताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. तारा सुरक्षित अधिवासात पोहोचल्याचे स्पष्ट होताच वनविभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघ सहसा मोठ्या जलाशयातून लांब पल्ल्याचे पोहणे टाळतात. मात्र, योग्य परिस्थितीत आणि गरज भासल्यास वाघ उत्कृष्ट पोहणारे प्राणी असल्याचे ताऱ्याने सिद्ध केले. मगरींचा धोका असतानाही तिने दाखवलेले धैर्य आणि शारीरिक क्षमता दुर्मिळ मानली जात आहे. ताऱ्याच्या या साहसामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली आहे. जंगलात मुक्तपणे वावरणाऱ्या वाघिणीची ही घटना मानवी हस्तक्षेपाशिवाय निसर्गात जगण्याची ताकद दाखवणारी ठरली आहे. ताऱ्याचे हे थरारक साहस केवळ एक घटना न राहता, व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा येथून आणलेल्या ‘तारा’ला ९ डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. १८ डिसेंबरला ती विलग्न वासाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून अधिवासाच्या शोधात बाहेर पडली. १९ डिसेंबर रोजी चांदोली वनक्षेत्रातील वारणा धरणाच्या बॅकवॉटरपाशी ती आली. त्याठिकाणी ती बराच वेळ बसली. सायंकाळी सहा वाजता तिने धरणाच्या पाण्यात उडी मारली.यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वाटले काहीवेळ पाण्यात राहून निवळे आदी जवळपास जाईल.मात्र तारा थांबलीच नाही.दोनशे मीटर गेल्यावर तिने डाव्या बाजूला वळून झोळंबी परिक्षेत्रात प्रवेश केला. या पाण्यात मोठ मोठ्या मगरी आहेत त्यामुळे ताराला धोका तर होणार याची चिंता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना होती.मात्र ताराने दुसऱ्या तीरावर म्हणजे झोळंबी परिक्षेत्रात प्रवेश करून रात्री शिकार ही केली.तीने झोळंबी कोअर झोन मधून बफर झोन मध्ये प्रवेश प्रवेश करून त्याठिकाणी तिचे वास्तव्य आहे.
वारणा धरणाच्या या क्षेत्रात मोठ्या मगरींची संख्या जास्त असल्याने वनविभागाच्या मनात तिच्या सुरक्षिततेबाबत धाकधूक होती. मात्र, ताकदवान ताराने सर्व संकटांवर मात करत झोळंबी परिक्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. विशेष म्हणजे, तिच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पाण्याखाली असतानाही उत्तमरीत्या काम करत होती, ज्यामुळे वनविभागाला तिच्या प्रत्येक हालचालीची अचूक नोंद घेता आली. ताराने पाणी पार केल्यानंतर केवळ विश्रांती घेतली नाही, तर त्याच रात्री झोळंबी कोअर झोनमध्ये शिकारही केली. सध्या तिचे वास्तव्य ढेबेवाडी बफर झोनमध्ये आहे.
जंगल क्षेत्रात वनविभागाने नुकतेच १०० चितळ सोडले आहेत. त्यांच्या आवाजामुळे तारा या शिकारीच्या क्षेत्राकडे आपल्या हद्दीचा अंदाज घेण्यासाठी ताराने हा धाडसी प्रवास केला. या भागात सोडलेल्या चितळांचा वावर आणि चंदा वाघिणीच्या खुणा यामुळे ती भक्ष शोधण्यासाठी या परिसरात आली असावी. तिच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे असे तुषार चव्हाण क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प यांनी सांगितले.